सेना, राष्ट्रवादीमुळे स्थानिक समित्यांच्या निवडी रखडल्या; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांपुढे जिल्हाध्यक्षांनी मांडले गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:23 AM2021-08-25T04:23:39+5:302021-08-25T04:23:39+5:30
या बैठकीस उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीसह कार्याचा आढावा देताना काही मागण्याही केल्या. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष संजय बोढारे ...
या बैठकीस उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीसह कार्याचा आढावा देताना काही मागण्याही केल्या. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष संजय बोढारे यांनी संघटनात्मक बांधणीसह बूथ समित्यांचा सविस्तर आढावा दिला. त्यानंतर परभणीचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी आढावा देत काँग्रेस कार्यकर्त्यांवर स्थानिक पातळीवर अन्याय होत असल्याची खदखद व्यक्त केली. ज्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक आहेत तिथे पुरेसा निधी दिला जात नाही, तसेच तीन पक्षांचा मेळ बसत नसल्याने समित्या, महामंडळाच्या नियुक्ती रखडल्या आहेत. त्यावर मार्ग काढून कार्यकर्त्यांना बळ देण्याची मागणी नदीम इनामदार यांनी केली.
परभणीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपुडकर यांनीही परभणीत काँग्रेसला बळ देण्याची मागणी केली. पक्षाकडून बळ दिले तर निश्चितच आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नांदेडचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आढावा दिला. प्रत्येक बूथवर सोशल मीडिया कार्यकर्ता असून प्रत्येकजण थेट अशोकराव चव्हाणांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कामाशिवाय पर्याय नाही, म्हणूनच नांदेड जिल्ह्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गाव तिथे शाखा स्थापन करण्याची मागणी शिंदे यांनी केली. महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी शहरातील आढावा देत असताना युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीसाठी निवडणुका न घेता मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली. तसेच प्रभागाची रचना न बदलता प्रभागात चार नगरसेवक हेच धोरण ठेवावे, अशीही मागणी केली. लातूरचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, महानगराध्यक्ष आनंद जाधव यांनीही कार्याचा आढावा दिला. सूत्रसंचालन काँग्रेस प्रवक्ता संतोष पांडागळे यांनी केले.
चौकट...
मंत्र्यापेक्षा पक्ष मोठा, प्रत्येकाच्या घरावर काँग्रेसचा झेंडा लावा
पक्षानी दिलेल्या ध्येय-धोरणानुसार कोणताही पदाधिकारी अथवा मंत्रीदेखील काम करत नसले, जिल्ह्यातील आढावा बैठकींना उपस्थित राहत नसेल तर मला रिपाेर्ट करा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षांना केल्या. तसेच आगामी काळातील निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक बांधणी करून बूथ कमिट्यांच्या नियुक्त्या करा. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावावा, अशा सूचनाही नाना पटोले यांनी केल्या.