संगतीचा परिणाम, हायचे होते अधिकारी पण अडकला खुनाच्या गुन्ह्यात
By शिवराज बिचेवार | Published: September 4, 2022 06:58 PM2022-09-04T18:58:06+5:302022-09-04T18:58:53+5:30
स्पर्धा परिक्षेची तयारी करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेला तरुण वाईट संगतीमुळे खूनाच्या गुन्ह्यात अडकला.
नांदेड : स्पर्धा परिक्षेची तयारी करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेला तरुण वाईट संगतीमुळे खूनाच्या गुन्ह्यात अडकला. त्यामुळे त्याची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. अधिकारी होण्याचे त्याचे अन् कुटूंबियांचे स्वप्नही भंगले आहे.
शहरातील ढवळे कॉर्नर भागात असलेल्या वाईन शॉप व्यवस्थापकाचा गुरुवारी रात्री खून करण्यात आला होता. साईनाथ इंगळे हा वाईन शॉपवर ट्युबर्ग ब्रॅण्डची बिअर आणण्यासाठी गेला होता. यावेळी व्यवस्थापक माधव वाकोरे यांनी या ब्रॅण्डची बिअर नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे चिडलेल्या इंगळे याने वाईन शॉप बंद करुन टाका असा वाद घातला. त्यानंतर तो परत गेला. परंतू थोड्याच वेळा आपल्या अन्य साथीदारांना घेवून तेथे आला.
यावेळी मारहाण करीत व्यवस्थापक वाकोरे यांना भोसकण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी साईनाथ सुभाष इंगळे (रा. दत्तनगर), उमेश सुभाष इंगळे आणि बालाजी मारोतराव कुरुडे या तिघांना अटक केली, तर इतर आरोपी पसार झाले होते. शनिवारी रात्री शैलेश रामनाथ अवधूतवार आणि अतुल धोंडीबा धर्मापुरीकर या दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण आठ आरोपींचा समावेश होता. आता उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे. दरम्यान, संबंधीत वाईन शॉप हे खासदार चिखलीकर यांचा पुतण्या तथा माजी नगरसेवक संदीप चिखलीकर यांच्या मालकीचे आहे. तर मयत वाकोरे हे त्यांचे नातेवाईक आहेत.
धर्मापुरीकर करीत होता स्पर्धा परिक्षेची तयारी
अतुल धर्मापुरीकर हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याला मित्राकडून फोन आला. ढवळे कॉर्नर येथे राडा झाला. तो लगेच त्या ठिकाणी धावला. त्याचवेळी व्यवस्थापकाचा खून झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतुल आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याऐवजी तो थेट तुरुंगात पोहोचला.