धक्कादायक! नांदेडमध्ये आणखी ७० रुग्णांची मृत्यूशी झुंज; खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:14 AM2023-10-03T09:14:14+5:302023-10-03T09:14:22+5:30
सोमवारी सकाळपर्यंतच २४ तासांत शासकीय रुग्णालयात एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
नांदेड: विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे परंतु अद्यापही रुग्णालयात तब्बल ७० रुग्ण अत्यवस्थ असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यामुळे या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी खासगी डॉक्टरांनी आपली सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच २४ तासांत शासकीय रुग्णालयात एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश असून १२ प्रौढ रुग्ण आहेत. त्यात पाच पुरुष आणि सात महिला यांचा समावेश आहे. प्रौढ रुग्णांमध्ये ४ हृदयविकार, एक विषबाधा, एक जठर व्याधी दोन किडनी व्याधी, एक प्रसुती गुंतागुंत, तीन अपघात व एक इतर आजाराचा रुग्ण आहे.
दरम्यान, रुग्णालयात औषधाचा मुबलक साठाच नसल्यामुळे डॉक्टरांनी चिठ्ठीवर पाच प्रकारची औषधे लिहून दिल्यानंतर त्यापैकी एक ते दोन औषधीच या ठिकाणी मिळतात. तर इतर औषधींसाठी महाविद्यालयाच्या बाहेर असलेल्या औषधी दुकानांवर जावे लागते. परंतु गोरगरिबांना पैसे खर्च करून औषधी खरेदी करणे आवाक्याबाहेरचे आहे.
मृत्यूची चौकशी कराच, पण ७० गंभीर रुग्णांचे प्राणही वाचवा-
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चौकशी समिती आज नांदेडमध्ये-
सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.
मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे-
भारत कांबळे (७५). हासलेबाई जाधव (७०). गंगाधर कोसे (७३), पंजाबाई राठोड (७५), रहेमाबी रशीद (६५), सारुबाई बोईनवाड (८०), सयाबाई जोंधळे (७०), अजय सदावर्ते (१९), मौसम बी शेख बाबा (८०), कलावतीबाई बाबा चव्हाण (८०), पल्लवी घनसावंत (१९), दिव्यांशी ठाकूर (दीड वर्ष) यांच्यासह दोन दिवसाच्या सात तर चार दिवसाचा एक आणि एक दिवसाच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तसेच एका अनोळखी तृतीयपंथीचा देखील मयतामध्ये समावेश आहे.