राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:12 PM2022-06-25T13:12:43+5:302022-06-25T13:14:45+5:30
आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान
नांदेड: शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांचा वेगळा गट स्थापन करून राज्यात सत्ताबदल करण्यास बंडखोर एकनाथ शिंदे सरसावले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठे विधान करत त्यानंतर भाजपची रणनीती उघड केली आहे. राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात दाखल होतील असा दावा चिखलीकर यांनी केला आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अचानक शिवसेनेचे प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत गुजरात गाठले. तेथून शिवसेनेच्या काही आमदारांसह त्यांनी आसाममधील गुवाहाटी गाठली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने सेनेत उभी फुट पडली आहे. तब्बल ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या आमदारांचा वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करण्याचा शिंदे यांचा हेतू आहे. यासर्व राजकीय उलाढालीवर भाजपाकडून अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. कदाचित अजित पवार यांच्या सोबत फसलेल्या पहाटेच्या शपथविधीमुळे भाजपा काळजी घेत आहे. शिंदे यांचा वेगळा गट निर्माण झाल्यानंतर भाजपा आपली भूमिका स्पष्ट करेल असे दिसत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर सातत्याने होणाऱ्या बैठकातून त्यांची व्यूहरचना तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यात सत्ता बदल करणे यासोबतच सेनेला मोठे खिंडार पडण्याची तयारी शिंदे यांनी केलेली आहे. माजी खासदार-आमदार, पदाधिकारी यांचा त्यांच्या गटाला पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात आणखी मोठी राजकीय उलाढाल होऊ शकते. तसे संकेत नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यास शिवसेनेचे १० खासदार भाजपात प्रवेश करतील असा दावा खा. चिखलीकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले आहे.
बंडखोर कल्याणकरांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही
नांदेड येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे आहेत. दरम्यान, कल्याणकर यांच्या कार्यालयावर संतप्त शिवसैनिक हल्ला करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चिखलीकर यांनी आमदार कल्याणकर यांची पाठराखण केली. कल्याणकर हे सेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपाने ही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते शिंदे सोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी खासदार चिखलीकर यांनी घेऊन एकप्रकारे शिवसैनिकांना इशारा दिला आहे.