सिडको वासीयांच्या घरे हस्तांतराचा प्रश्न लवकरच सोडवू, अशोक चव्हाण यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:52 PM2022-03-29T12:52:19+5:302022-03-29T12:54:51+5:30
नांदेडच्या विकासात्मक कामांकरिता आम्ही कधीही कमी पडलो नाही, यापुढेही कमी पडणार नाही
नांदेड: 'सिडको'च्या मुळ घर धारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे बैठक पार पडली, लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल, नांदेडच्या विकासात्मक कामांकरिता आम्ही कधीही कमी पडलो नाही, यापुढेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
नांदेडच्या 'सिडको' परिसरातील अर्थात प्रभाग क्र.१९ व २० अंतर्गत मंजूर कोट्यावधी रूपयांच्या विविध विकास कामांच्या भूमीपूजन सोहळा झाला. पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्याचे काम आम्ही करीत आहोत. 'सिडको'वासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अर्थातच 'सिडको'च्या मुळघरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वीच मुंबई येथे आ. हंबर्डे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीला संबंधित विभागाचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांना बोलावून घेवून घरे हस्तांतरणाच्या समस्येसंदर्भात मार्ग काढण्याची सूचना देण्यात आली आहे. घरे हस्तांतरण करण्याची समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी विचारमंचावर आ. अमरनाथ राजूरकर व नांदेड 'दक्षिण'चे आ. मोहनराव हंबर्डे यांच्यासह महापौर जयश्री पावडे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनय गिरडे पाटील, आयुक्त डॉ. सुनील लहाने, माजी नगरसेविका प्रा. डॉ. ललिता शिंदे-बोकारे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अपर्णा नेरलकर, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नवीन नांदेड परिसरातील कौठा, वसरणी, असर्जन व 'सिडको-हडको'तील लोकप्रतिनिधी आजी-माजी नगरसेवकांसह बहुसंख्य पदाधिकारी तसेच काँग्रेसच्या महिला-पुरूष कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.