पीकविमा तक्रारी निवारणासाठी गावोगावी शिबिरे घ्या-अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 07:03 PM2019-08-01T19:03:18+5:302019-08-01T19:04:31+5:30
पीकविमा अन् कर्जमाफीही मिळेना, मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
नांदेड : पीकविम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, पीकविमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई दिलेली नसल्याचे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुष्काळ व सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे़ त्यांना पीक विम्याच्या भरपाईच्या माध्यमातून भरीव मदतीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतानाही कर्जमाफी मिळालेलीच नसल्याचीही अनेक प्रकरणे आहेत़ कर्जमाफी आणि पीकविम्याची समस्या केवळ एखाद्या गावापुरती मर्यादित नसून, ती राज्यव्यापी समस्या आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा गावाप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात पीकविमा तक्रार निवारण शिबिरे घ्यावी़ या माध्यमातून प्रशासन आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष शेतकऱ्यांना पीक विम्यासंदर्भात व्यथा मांडण्याची संधी मिळू शकेल, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले आहे़