अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न
By श्रीनिवास भोसले | Published: April 1, 2024 12:22 PM2024-04-01T12:22:35+5:302024-04-01T12:28:30+5:30
एक मराठा लाख मराठाच्या घोषणा: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथे गेले असता गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. गावकऱ्यांचा रोष पाहून अशोकराव चव्हाण यांना माघारी परतावे लागले.गाड्या परतल्यानंतर त्यावर दगड फेक करण्याचाही प्रयत्न काही तरुणांनी केला.
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात एन्ट्री करताच त्यांचा ताफा गावकऱ्यांनी आडविला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा तरुणांनी दिल्या. यावेळी अशोकराव चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यावेळी पोलिसांनी जमा पांगविण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु गावकऱ्यांचा रोष वाढत असल्याचे पाहून अशोकराव चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. अशोकराव चव्हाण यांचा ताफा परत नांदेड च्या दिशेने निघाला. मराठा समाजासह इतर समाजाच्या तरुणांचाही समावेश होता. अखेर पोलिसांच्याच गाडीमध्ये अशोक चव्हाण यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.
एक मराठा, लाख मराठा घोषणा देत नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न #LokSabhaElection2024#nandedpic.twitter.com/IVQ8WNeZJ5
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 1, 2024
शेतकरी संघटनेचे गाव
अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावाची ओळख शेतकरी संघटनेचे गाव म्हणून आहे. या ठिकाणी काँग्रेसचे दिग्गज नेते देखील राहतात. मराठा आरक्षण चळवळीत येथील तरुणांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कोणत्याच राजकीय नेत्यांना गावात एन्ट्री दिली जाणार नाही अशीच भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे.