नांदेड जिल्हा बँकेवर अशोकरावांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:26+5:302021-04-05T04:16:26+5:30
सुनील जोशी नांदेड - नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ...
सुनील जोशी
नांदेड - नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने एकहाती विजय मिळविला. २१ पैकी १७ जागांवर विजय प्राप्त केला. अशोकरावांचा करीश्मा असेच या विजयाचे विश्लेषण करावे लागेल.
सुरुवातीच्या काळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र काहीजण जागांवर अडून राहिल्याने निवडणुकीशिवाय पर्याय राहिला नव्हता. राज्यात सध्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीकडून लढविल्या जात आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही महाविकास आघाडीकडून लढविण्यात आली. आघाडीचे नेतृत्व अशोकराव चव्हाण यांनी केले. सक्षम उमेदवार दिले. उमेदवाराची पारख स्वत: अशोकरावांनी केली. निवडून येतील अशांनाच त्यांनी रिंगणात उतरविले. यात ते यशस्वी झाले. २१ पैकी १७ जागा मिळवण्यात यश प्राप्त केले. निवडणुकीत भाजपाप्रणित व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. नांदेड जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. महापालिकेतही काँग्रेसचे वर्चस्व आहे. आता सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेवरही अशोकराव चव्हाण यांनी एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.
काही वर्षापूर्वी जिल्हा बँकेबाबतीत फारसे चांगले बोलले जायचे नाही. मुख्यमंत्री असताना अशोकराव चव्हाण यांनी या बँकेला मदत करून उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला होता. १०० कोटींची मदत त्यांनी त्यावेळी बँकेला केली होती. त्यानंतरच बँकेने तग धरली. आज बँकेची स्थिती बऱ्यापैकी आहे. आता खुद्द अशोकराव चव्हाण यांचे या बँकेकडे लक्ष राहणार आहे. त्यामुळे ही बँक पुन्हा एकदा शेतकरी, कष्टकरी आदींसाठी हितकारक ठरेल, यात शंका नाही.
गंगाधरराव कुंटूरकर गेले
माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर हे नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील दिग्गज नेतृत्व. धूरंधर राजकारणी. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार बँकेचे संचालक, बिलोली विधानसभेचे आमदार, नांदेड लोकसभेचे खासदार, राज्यमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषविले हाेते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. अधिकारी त्यांच्यासमोर यायला घाबरायचे. उत्तर देत अधिकाऱ्यांना नाकीनऊ यायचे. असा ग्रामीण भागाशी नाळ असलेला नेता नांदेडकरांनी गमावला आहे.