नांदेड जिल्ह्यात आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेला धान्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:45 PM2020-12-23T16:45:37+5:302020-12-23T16:50:14+5:30
कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
- भारत दाढेल
नांदेड : राज्य शासनाने ९ वी ते १२ वी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य असून आदिवासी आश्रमशाळेतील चित्रही असेच आहे. जिल्ह्यात ४४ आश्रमशाळा सुरू असून वसतीगृहे मात्र अद्याप बंदच आहेत. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा तसेच निधी उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणचे विद्यार्थी अद्याप घरीच बसून आहेत.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळीनंतर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्केच आहे. तर आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीही आश्रमशाळेत आले नाहीत. काही ठिकाणी अनिवासी आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. मात्र निवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनुदानित आश्रमशाळेला वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने या आश्रमशाळाही अडचणीत आल्या आहेत. आदिवासी विभागाच्या जिल्ह्यात १६ शासकीय तर १६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या ठिकाणी एका शाळेत सरासरी ४०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या आश्रमशाळा सुरू झाल्या असल्या तरी जेवणाची सोय नसल्याने या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण झाला आहे.
आश्रमशाळांसमोरील अडचणी
कोरोनामुळे मागील आठ, नऊ महिन्यापासून बंद असलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या असून आदिवासी विभागाच्या आश्रमशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहाराची सोय होत नसल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अद्याप येत नसल्याचे तसेच अनुदानित आश्रमशाळेला निधी मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
वसतिगृहांसमोरील अडचणी
जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे १६ वसतीगृहे असून सध्या तरी हे वसतीगृह बंद अवस्थते आहेत. इयत्ता आठवी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या वसतीगृहात प्रवेश घेतात. एका वसतीगृहाची प्रवेश क्षमता जवळपास १०० असून सर्व वसतीगृहात १ हजार ६०० विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवण्याच्या सोयीसोबतच त्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यात येतात. मात्र हे वसतीगृह सध्या बंद आहेत.
जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४४ आश्रमशाळा असून या आश्रमशाळा शासन निर्णयानुसार कोरोना विषयक सर्व नियम पाळून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत असून लवकरच आश्रमशाळेतील उपस्थिती शंभर टक्के होईल.- माळवदकर, समाज कल्याण अधिकारी, नांदेड