प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! मराठवाडा एक्स्प्रेसला ग्रहण; उद्या तासभर उशिरा धावणार
By प्रसाद आर्वीकर | Published: April 4, 2023 07:40 PM2023-04-04T19:40:15+5:302023-04-04T19:40:31+5:30
नांदेडहून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
नांदेड : धर्माबाद येथून सुटणाऱ्या मराठवाडा एक्स्प्रेसला पुन्हा ग्रहण लागले असून, ५ एप्रिल रोजी ही रेल्वे एक तास उशिरा सुटणार आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने, प्रवाशांच्या नियोजनाचा खोळंबा होत आहे.
नांदेडहून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. न्यायालयीन कामकाजासह शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय कारणासाठी अनेक नागरिक दररोज हजारोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगर येथे जातात. दिवसभराची कामे उरकून रात्री परत आपल्या गावी पोहोचण्याचे नियोजन नागरिकांनी केलेले असते. शासकीय कार्यालय सुरू होण्यापूर्वी पोहोचणे ही बाब महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रवाशांसाठी धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सोयीची ठरत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून ही रेल्वेगाडी विलंबाने धावत आहे. धर्माबाद येथून सकाळी ४ वाजता सुटणारी ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरात अकरा वाजेपर्यंत पोहोचते; परंतु ५ एप्रिल रोजी ही रेल्वेगाडी धर्माबाद येथून एक तास उशिरा सुटणार आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.
अनेक गाड्या धावल्या उशिरा
मंगळवारी रेल्वे प्रशासनाने सेलू, ढेंगळी पिंपळगाव, मानवत रोड या ठिकाणी रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम करण्यासाठी ५ तासांचा लाइन ब्लॉक घेतला होता. त्यामुळे ४ एप्रिल रोजी मुंबई-नांदेड (तपोवन), नांदेड-पुणे, काचीगुडा-रोटेगाव आणि नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.