लिलाव एका वाळू घाटाचा, उपसा मात्र आठ घाटातून !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 06:49 PM2018-01-02T18:49:50+5:302018-01-02T18:50:39+5:30
हदगाव तालुक्यातील पैनगंगा व कयाधू नदीवर १४ वाळूघाट असून जिल्हाधिकारी कार्यालयाने कयाधूवरील सहा घाट अपात्र ठरविले़ दुसरीकडे पैनगंगेवरील एकाच घाटाचा लिलाव झाला असला तरी उर्वरित घाटांवरून वाळू उपसा सुरू आहे़
नांदेड : हदगाव तालुक्यातील पैनगंगा व कयाधू नदीवर १४ वाळूघाट असून जिल्हाधिकारी कार्यालयाने कयाधूवरील सहा घाट अपात्र ठरविले़ दुसरीकडे पैनगंगेवरील एकाच घाटाचा लिलाव झाला असला तरी उर्वरित घाटांवरून वाळू उपसा सुरू आहे़
फेब्रुवारी, मार्च महिन्यात वाळू उपसा सुरू होतो़ पाऊस कमी झाल्याने वाळू कमी असते़ उपसा मात्र लवकर केला जातो़ तालुक्यातील मोजक्याच वाळू घाटांचा मागील दोन वर्षांपासून लिलाव सुरू आहे़ २०१५ मध्ये वाळू घाटांचा लिलाव झालाच नाही़ महत्त्वाचे म्हणजे या घाटावरून वाळूची वाहतूक बारमाही सुरू असल्याने वाळू घाट घेणार्यांचे अनामत रक्कमही निघणे अवघड आहे़ त्यामुळे वाळू घाट घेण्याकडे कोणीही लक्ष देत नाही़
कयाधू नदीवरील करमोडी, उंचाडा, मार्लेगाव, पिंपरखेड, चेंडकापूर हे प्रमुख वाळू घाट आहेत़ या नदीपात्रातील वाळू वापरण्यास योग्य नसल्याने जिल्हाधिकार्यांनी हे वाळू घाट अपात्र ठरविले आहेत़ चेंडकापूर येथील घाटावरून निवघा, मनाठा मंडळातील ट्रॅक्टर, टिप्पर रात्रीला उपसा करीत असतात़ नागपूर-तुळजापूर रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने हे काम देणार्या एजन्सीने बरडशेवाळा येथे त्यांचा कॅम्प उभारला़ याच कामासाठी घाटातील हजारो ब्रास वाळू उपसा करून विक्री करण्यात आली़
एकाच घाटावर रात्रीला २० ट्रॅक्टर व सहा टिप्पर सुरू आहेत़ पोलिसांसह महसूल खात्याच्या अधिकार्यांकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते़ २८ डिसेंबर रोजी दोन टिप्पर मनाठा पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आले़ मात्र तडजोडीनंतर ते सोडून देण्यात आले़ संबंधितांनी रॉयल्टी भरल्याची पावती दाखविल्याचे पोलिसांनी सांगितले़ मात्र या वाळू घाटांचा लिलावच झाला नाही़ तर रॉयल्टी भरण्याचा प्रश्नच कुठे येतो? रॉयल्टी भरून टिप्पर वाळू वाहतूक सुरू होती तर सोबत परवाना का ठेवला नाही? असा प्रश्न आहे़
काही मंडळी ४० ब्रासची रॉयल्टी भरतात़ मात्र वाळू वाहतूक ४०० ब्रास करतात़ याला जबाबदार कोण? असा सवाल आहे़ वेगवेगळ्या घाटांवर दोन किंवा तीन गट करून ही मंडळी असते़ संबंधितात बिनसले की हीच मंडळी पोलीस, तलाठी किंवा तहसीलदारांना फोनद्वारे अवैध वाळूची माहिती देतात़ त्यानंतर छोटी मोठी कारवाई होते़ एक-दोन दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते़
पथके नेमली आहेत
तुम्ही सांगता तसा प्रकार तालुक्यात नाही़ माहिती मिळताच कारवाई करु. वाळू उपशावर नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळी पथके नेमली आहेत
- विजय येरावाड, नायब तहसीलदार, हदगाव़