नांदेड मनपा गाळ्यांचेही आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:04 AM2019-07-04T01:04:25+5:302019-07-04T01:04:39+5:30
नांदेड : पावसामुळे राज्यात होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातही महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या गाळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याचा निर्णय ...
नांदेड : पावसामुळे राज्यात होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातही महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या गाळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेने गाळेधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत.
पुणे आणि मुंबईत अतिवृष्टीमुळे जवळपास ५० हून अधिक बळी गेले आहेत. नांदेड महापालिकेनेही शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात जवळपास १०१ इमारती धोकादायक आहेत. यात खाजगी मालमत्तासह महापालिकेने आपल्या स्वत:च्या मालमत्तांचेही स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात महापालिकेच्या मालकीचे जवळपास १४ व्यापारी संकुल आहेत. या व्यापारी संकुलात जवळपास पाचशेंहून अधिक गाळेधारक भाड्याने आहेत.
महापालिकेची अनेक व्यापारी संकुले जीर्ण झाली आहेत. ही व्यापारी संकुले कधीही कोसळू शकतील, अशी परिस्थिती आहे. त्याचवेळी मुदत पूर्ण न झालेलीही व्यापारी संकुले धोकादायक झाली आहेत. महापालिकेने १५ दिवसांपूर्वीच गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. स्ट्रक्चरल आॅडीटच्या अहवालानंतर गाळेधारकांना ठेवायचे की काढायचे? याचा निर्णय महापालिका घेणार आहे.
महापालिकेच्या १४ व्यापारी संकुलांपैकी शिवाजीनगर, गांधी पुतळा, जुना मोंढा आदी भागांतील व्यापारी संकुलांची प्राथमिक पाहणी केली जात आहे. दरम्यान, महापालिकेने बजावलेल्या नोटीसमध्ये गाळेधारकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत आपल्या गाळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन हा अहवाल महापालिकेत सादर करावयाचा आहे. महापालिकेच्या नोटीसनंतर काही गाळेधारकांनी स्ट्रक्चरल आॅडीटचा अहवाल महापालिकेत सादर केला आहे. उर्वरित गाळेधारकांनीही स्ट्रक्चरल आॅडीट अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश मालमत्ता विभागाने दिले असल्याचे मालमत्ता व्यवस्थापक राजेश चव्हाण यांनी सांगितले. एकूणच महापालिकेने पावसाळ्याच्या दुर्घटना पाहता खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे.
जनता मार्केटची मुदत संपली
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर येथील जनता मार्केटच्या इमारतीची मुदत संपल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. महापालिकेने यापूर्वीच ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संकुलातील काही गाळेधारक न्यायालयात गेल्याने हा विषय प्रलंबित राहिला आहे. आता या इमारतीची मुदत संपल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने आता या इमारतीचे काय होईल, याकडे लक्ष लागले आहे.