स्वयंचलित हवामान केंद्रच कुचकामी; हवामानाच्या आकडेवारीवर होतोय परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:28 PM2020-10-23T18:28:40+5:302020-10-23T19:07:37+5:30
हवामान केंद्रांची कृषी हवामानशास्त्रज्ञ व स्कायमेट कंपनीच्या तज्ज्ञ प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासणी
नांदेड : जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्राची कृषी हवामान शास्त्रज्ञ व स्कायमेट कंपनीच्या तज्ञ प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली असता बहुतांश हवामान केंद्रांची भारतीय हवामान खात्याच्या निकषाप्रमाणे उभारणी झााली नसल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे या हवामान केंद्राच्या परिसरात कुठे घराचे बांधकाम झाले आहे तर कुठे प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. त्यामुळे हवामानाच्या आकडेवारीवर परिणाम होत असल्याचे तपासणी अभ्यासातून पुढे आले आहे.
जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे तेथे फळ पीक विमा मंजूर झाला नाही. तर कमी विमा नोंदविलेल्या महसूल मंडळामध्ये फळ पीक विमा मंजूर झाल्याचा प्रकार यंदा पुनर्रचित हवामाना आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये घडला आहे. या संदर्भात अर्धापूर, दाभड, लिंबगाव, तरोडा, तुप्यासह इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल सादर केला. समितीने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबीया बहार सन २०१९-२० योजनेअंतर्गत केळी या फळ पीकासाठी एकूण अधिसूचित महसूल मंडळापैकी रॅन्डम पद्धतीने सहा महसूल मंडळाची तपासणीसाठी निवड केली. यातील तीन मंडळे विमा मंजूर झालेल्या पैकी तर उर्वरित तीन मंडळे विमा ना मंजूर झालेल्या पैकी होती. समितीला या तपासणीत बहुतांश ठिकाणची स्वयंचलित हवामान केंद्र भारतीय हवामान खात्याच्या निकषाप्रमाणे बसविली नसल्याचे दिसून आले.
समितीने दिला अभिप्राय शासनाकडे प्रस्ताव पाठविणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल सादर करतानाच समितीचा अभिप्राय स्पष्ष्टपणे नोंदविला आहे. फळ पीक विमा नामंजूर झालेल्या महसूल मंडळामध्ये शेजारील विमा मंजूर झालेल्या महसूल मंडळाच्या हवामानाची आकडेवारी ग्राह्य पकडून नुकसान भरपाई द्यावी अथवा सलग चार दिवस अनुक्रमे ४२ व ४५ अथवा तीन दिवस ४२ व ४५ तापमान असल्यास एकूण नुकसान भरपाईच्या सलग चार दिवसासाठी ८० टक्के व तीन दिवसांसाठी ६० टक्के या प्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
केंद्राच्या देखभालीची स्ंयुक्त जबाबदारी घ्यावी
समितीने सहा महसूल मंडळातील अर्धापूर, दाभड, बारड, मुदखेड आणि मुगट या स्वयंचलित हवामान केंद्राची संयुक्त पाहणी केली. यातील बहुतांश ठिकाणी केंद्राची उभारणी निकषाप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. याचा परिणाम हवामानच्या आकडेवारीवर होत आहे. समितीने केंद्राची उभारणी निकषाप्रमाणे करण्यास सूचित केले आहे.याबरोबरच केंद्राच्या सुरक्षेची व देखभालीची जबाबदारी ग्राम पंचायत व स्कायमेट प्रतिनिधी यांनी करावी असे सांगितले आहे.
- बाळासाहेब पाटील रावणगावकर, सभापती तथा समिती सदस्य, नांदेड