पाकी काळाडोह, जाकापूर साठवण तलावालाही उपलब्धता प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:16 AM2019-06-28T00:16:48+5:302019-06-28T00:19:14+5:30
रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी उलब्धता प्रमाणपत्रही मिळाले आहे.
नांदेड : रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव येथील साठवण तलावाची निर्मिती करणे यासाठीचे शासनाचे दोन दिवसांपूर्वीच पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता भोकर तालुक्यातील पाकी काळाडोह व जाकापूर साठवण तलावाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले पाणी उलब्धता प्रमाणपत्रही मिळाले आहे. मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले असून, यामुळे भोकर तालुक्याचा पाणीप्रश्न मिटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भोकर तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. अमिताताई चव्हाण मागील काही वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हाच मोठा अडसर ठरत होता. यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर लढाई लढण्यात आली. राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या आराखड्यामध्ये सर्वात आधी मध्य गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २९.८१ टीएमसी पाणी मिळाले. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२९.८१ टीएमसी पाण्यापैकी १७ दलघमी पाणी भोकर तालुक्याच्या सुधा उपखोºयाच्या वाट्याला आले. त्यातून भोकर तालुक्यातील अनेक लघु मध्यम प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे व पिंपळढव आणि दिवशी येथील साठवण तलाव निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाशिकच्या नियोजन व जल विज्ञान विभागाकडून नुकतेच मिळाले.
हे प्रमाणपत्र अशोकराव चव्हाण यांनी पिंपळढव येथील एका कार्यक्रमात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंचांना सुपूर्द केले. गावकऱ्यांनीही या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत केले. या घटनेस २४ तास उलटले नाहीत तोच पाकी काळाडोह व जाकापूर येथील साठवण तलावासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून घेण्यात यश मिळाले आहे.
मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याला पाण्याची उपलब्धता रहावी, यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी मोठे काम केले आहे़ सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझाही अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे़ या पाठपुराव्याला यश मिळाले असून नुकत्याच मिळालेल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्रामुळे भोकर तालुका अधिक सुजलाम होईल, असा विश्वास वाटतो़ -अशोक चव्हाण