नांदेड जिल्ह्यात दररोजच्या पेट्रोल विक्रीत सरासरी २० हजार लिटरची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:52 PM2018-06-03T23:52:07+5:302018-06-03T23:52:07+5:30
जिल्ह्यातील शंभरावर पेट्रोलपंपांना त्याचा फटका बसला असून सरासरी एका पेट्रोलपंपावर २०० ते २५० लिटर पेट्रोलची विक्री कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत असल्यामुळे बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभरावर पेट्रोलपंपांना त्याचा फटका बसला असून सरासरी एका पेट्रोलपंपावर २०० ते २५० लिटर पेट्रोलची विक्री कमी झाली आहे. त्यातून पेट्रोल पंपचालकांच्या व्यवसायाला जवळपास पावणेदोन कोटी रुपयांच्या फटका बसला आहे.
देशभरात सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील दुचाकीस्वारांची १०० तर चारचाकी चालकांची ५०० रुपयांचे पेट्रोल भरण्याची मानसिकता आहे. पूर्वी १०० रुपयाचे पेट्रोल भरले तर १.२२ लिटर पेट्रोल येत होते. ते आता १.६ ते १.७ लिटर मिळते. साधारणपणे चार दिवस पुरणारे पेट्रोल आता दोनच दिवसांत संपत आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच गाडीचा वापर केला जात आहे. एरव्ही सर्वच पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. आता मात्र पंपावर वाहनांची संख्या किरकोळ दिसत आहे.
नांदेड जिल्ह्यात आजघडीला शंभरावर पेट्रोलपंप आहेत. इंधन दरवाढीनंतर सरासरी २० ते २५ टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे सरासरी एका पेट्रोलपंप चालकाचा २५ ते ३० हजार रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. जिल्ह्यातील १०० पेट्रोलपंपाचा विचार केल्यास हा आकडा पावणेदोन कोटीपर्यंत जात आहे. त्याचबरोबर पेट्रोलपंपावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत पेट्रोलचे दर एक पैशापासून ते पाच ते सात पैशांनी कमी करण्यात आले होते़ परंतु, इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचाच प्रकार सरकारने केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती़ येत्या काही दिवसांत इंधनाचे दर कमी न झाल्यास नागरिकांच्या संयमाचा बांध तुटून मोठा भडका उडू शकतो़
---
पेट्रोल विक्रीत झाली घट
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचा विक्रीवर परिणाम होत आहे़ पेट्रोलपंपचालकांना लिटरवर कमिशन मिळत असते़ परंतु, काही दिवसांत सरासरी पेट्रोलपंप चालकांची विक्री २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली़ त्यामुळे इतर खर्चावरही परिणाम झाला, अशी प्रतिक्रिया पेट्रोलपंपचालक सचिन पाळेकर यांनी दिली़
---
मागील आठ दिवसांत असे होते दर
२६ मे रोजी नांदेड शहरात पेट्रोलचे दर ८७़२५ पैसे तर डिझेल ७३़६८ पैसे लिटर होते़ २७ मे- पेट्रोल-८७़४०, डिझेल-७३़८४, २८ मे पेट्रोल-८७़५४, डिझेल-७३़९६, २९ मे पेट्रोल-८७़७०, डिझेल-७४़१०, ३० मे पेट्रोल-८७़७९, डिझेल-७४़०९, ३१ मे पेट्रोल-८७़६२, डिझेल-७४़०४, १ जून पेट्रोल-८७़५६, डिझेल-७३़९९, २ जून पेट्रोल-८७़४७, डिझेल-७३़८९ तर ३ जून रोजी नांदेडात पेट्रोल-८७़८९ तर डिझेल ७३़८९ पैसे लिटर होते़
कोणत्याही ठिकाणी कामासाठी जायचे असल्यास पूर्वी सर्रासपणे दुचाकीचा वापर केला जात होता. आता मात्र पेट्रोलच्या बचतीसाठी डबल आणि ट्रीपल सिटचा वापर वाढला आहे.पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत वाढ होते.