९० व्या वर्षी विधिची परीक्षा देणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:17 AM2018-04-29T01:17:35+5:302018-04-29T01:17:35+5:30
आजकालच्या तरुणांना शिक्षणात विशेष रस नाही, परंतु शिक्षणाची अविट गोडी चाखल्यानंतर त्यापासून दूर जाण्याची इच्छाच होत नाही, असा जिवंत अनुभव कथन करणारा मुंबईच्या मुख्य भागात राहणारा शिक्षणप्रेमी अवलिया प्रोफेसर मलिक फैजलअली खान हा सद्गृहस्थ वयाच्या ९० व्या वर्षी स्वारातीम विद्यापीठाची कायद्याची परीक्षा देत आहे. विशेष म्हणजे, या वयातही हा अवलिया चष्म्याविना परीक्षेचा पेपर लिहीत आहे.
निवृत्ती भागवत।
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरनगर : आजकालच्या तरुणांना शिक्षणात विशेष रस नाही, परंतु शिक्षणाची अविट गोडी चाखल्यानंतर त्यापासून दूर जाण्याची इच्छाच होत नाही, असा जिवंत अनुभव कथन करणारा मुंबईच्या मुख्य भागात राहणारा शिक्षणप्रेमी अवलिया प्रोफेसर मलिक फैजलअली खान हा सद्गृहस्थ वयाच्या ९० व्या वर्षी स्वारातीम विद्यापीठाची कायद्याची परीक्षा देत आहे. विशेष म्हणजे, या वयातही हा अवलिया चष्म्याविना परीक्षेचा पेपर लिहीत आहे.
प्रोफेसर मलिक फैजअली खान यांचा जन्म १९२९ मध्ये हैदराबाद शहरात अॅबिडस् रोडजवळील वस्तीत झाला. त्यांचे वडील फैजअलीखान निझामाचे सचिव होते. त्यांचे प्राथमिक आणि हायस्कूलपर्यंतचे शिक्षण गनफाऊंड्री विद्यालयात झाले. चादरघाट कॉलेजमध्ये त्यांनी पीयुसी केले.
उस्मानिया विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी मिळविली. नेपाळमधील काठमांडू येथे राहून एम.ए.ची पदवी मिळविली. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून एम.कॉम.ची पदवी संपादन केली. मुंबई विद्यापीठातून एम.एड्. केले. मद्रास विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केली. मनुमान्यम सुंदर विद्यापीठ केरळ येथून एमएस्सी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. कामराज विद्यापीठातून एम.ए. इंग्लिश, दक्षिण भारत विद्यापीठातून एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. सायकॉलॉजी, मुंबई विद्यापीठातून बी.लिब. केले. याचबरोबर पदवी, पदविका मिळून एकूण १६ वर पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठात लॉसाठी प्रवेश घेतला. पदवी अपूर्ण राहिली. योगायोगाने मुलाने स्वारातीम विद्यापीठातून बी.एड. केले. येथे प्रवेश घेण्याची इच्छा झाली. लॉसाठी प्रवेश घेतला.
योगायोग...
प्रोफेसर फैजअली यांच्या मुलाने स्वारातीम विद्यापीठातून बी.एड. केले. आपणही येथे प्रवेश घ्यावा, अशी इच्छा होऊन फैजअली यांनी लॉसाठी प्रवेश घेतला.