ज्येष्ठ कलावंत मानधनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:37+5:302021-03-14T04:17:37+5:30
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक वर्षापासून सांस्कृतिक व ईतर सर्वच सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर कडक निर्बंध घातले गेलेले आहेत. ...
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक वर्षापासून सांस्कृतिक व ईतर सर्वच सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर कडक निर्बंध घातले गेलेले आहेत. त्यामुळे लोककलावंतांचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आहेत, शिवाय या काळात शासनाकडूनही त्यांना कुठलीच मदत न झाल्याने, कलावंतांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. वयोवृद्ध-ज्येष्ठ कलावंतांना आणि साहित्यिकांना शासनाकडून मानधन मिळण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. त्यातून दरवर्षी शंभर कलावंतांची निवड जिल्हा निवड समितीमार्फत करून त्यांना मानधन दिले जाते. सन २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन आर्थिक वर्षातील सुमारे २०० ज्येष्ठ कलावंतांचे १६ तालुक्यातील प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे गेलेले असून, त्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया खोळंबली आहे.
साहित्यिक, ज्येष्ठ कलावंतांची निवड करण्यासाठी निवड समितीचे गठण झाल्यानंतर या समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यांचे मानधन प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास मंजुरीस्तव सादर केले जात असतात, परंतु निवड समितीच गठीत नसल्याने कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोविडमुळे आर्थिक मार्ग बंद झालेल्या कलावंतांच्या कुटुंबीयांची उपासमार सुरू असून, वृद्धापकाळात लागणारे औषधी आणि उपचाराचा खर्च भागविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण यांनी लक्ष घालून जिल्हास्तरीय वृद्ध कलाकार मानधन समितीचे गठण तातडीने करण्याचे निर्देश द्यावेत, त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.