नांदेड येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:03+5:302021-02-15T04:17:03+5:30
नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड आणि फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बळीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या ...
नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड आणि फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बळीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या ३२ व्या ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत नांदेड बसस्थानक येथे ११ फेब्रुवारी रोजी ‘निळ्या आकाशातील लाल वादळ’ या कलामंचातर्फे सादर केलेल्या पथनाट्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती तसेच अपघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगावी यासंबंधी जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील सोळा तालुक्यांत भ्रमंती करीत उपरोक्त कलापथकातील कलाकारांच्या सहाय्याने विविध महाविद्यालयात, शहरातील मुख्य चौकात पथनाट्य सादर करीत दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकीत बसलेले असताना सीट बेल्टचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, शालेय बसमधून प्रवास करताना मुलांनी घ्यावयाची काळजी अशा अनेक बाबींवर उचित नाट्यमय प्रसंग उभे करून लोकप्रबोधन करण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे पालन केल्याने आपण किती तरी अपघात टाळू शकतो हे पटवून देण्यात येत आहे. सर्व वाहन धारकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे सूत्र समजावताना आणि वाहतुकीच्या नियमांचे संदेश देताना प्रत्येक शहरात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे संतोष तेलंग, साईप्रसाद जळपतराव यांनी सांगितले. कलामंचाचे मुख्य गायक माधव वाघमारे, सविता गोदाम, तबलावादक संभाजी आरलेवाड, बाबुराव नामेवार, दत्ता पोटलेवाड, अनिल वाघमारे, साहेबराव वाघमारे, रूपा गडमवार, सारिका तपासकर आदी कलावंत परिश्रम घेत आहेत.