माकडांच्या त्रासाने शेकडो वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:55+5:302021-05-19T04:17:55+5:30
कुपटी : पूर्वी चारही बाजूला शेत शिवारात उंच उंच दिसणारे डोलदार व गारवा देणारे वृक्ष आज दिसेनासे झाले आहेत. ...
कुपटी : पूर्वी चारही बाजूला शेत शिवारात उंच उंच दिसणारे डोलदार व गारवा देणारे वृक्ष आज दिसेनासे झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना होणारा माकडांचा त्रास. माकडांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी शेतकरी थेट डेरेदार वृक्षांवरच कुऱ्हाड चालवत आहेत.
माहूर तालुक्यातील कुपटी परिसरात या पद्धतीने वृक्षांची कत्तल दिवसाढवळ्या होत आहे. वृक्ष जगवायचे असतील तर या माकडांचा बंदोबस्त होणे आवश्यक झाले आहे. मात्र, सध्या तरी या माकडांकडे कुणाचेच लक्ष नाही. माहूर तालुक्यातील कुपटी परिसर हा जंगलव्याप्त भाग असल्याने पाण्याचे शोधामध्ये शेतशिवारात गत काही दिवसांपासून जंगलामधून माकडे शेतशिवारात घुसत आहेत. त्यामुळे माकडांचा प्रचंड त्रास वाढला आहे. त्यांच्यापासून शेत मालाची नासाडी होत आहे. माकडे व रोही (नीलगाय) यांनी शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. या माकडांच्या त्रासामुळे कंटाळून आणि शेतकरी शेतशिवारातील बाभूळ, आंबा, चिंच, कडुलिंब, मोहन फूल, खैरे यादी वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालत आहेत. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर सावलीसाठी मोठी झाड दिसले की माकडे आपले बस्तान मांडतात. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी त्या शेतकऱ्यावर दबाव आणून झाड तोडण्यास भाग पाडतात.