कोरोना काळात एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेकडून बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:00+5:302021-01-15T04:16:00+5:30
नांदेड : जिल्ह्यात मागील वर्षी एका एचआयव्ही पाॅझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिला असून, सध्या ६ हजार ...
नांदेड : जिल्ह्यात मागील वर्षी एका एचआयव्ही पाॅझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिला असून, सध्या ६ हजार ३७४ ॲक्टिव्ह एचआयव्ही रुग्ण उपचार घेत आहेत. यात पुरुषांची संख्या २ हजार ९५३ तर महिलांची संख्या २ हजार ९३८ आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेडअंतर्गत एचआयव्ही, एड्स जनजागरणासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेतले जातात.
यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. गरोदर मातेपासून बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक मातेची गरोदरपणात एचआयव्ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यातच ज्या पूर्वीपासून एचआयव्हीबाधित आहेत. त्यांचे बाळ बाधित जन्माला येऊ नये, यासाठी उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, मागील तिमाहीत एका पाॅझिटिव्ह मातेने एका बाळाला जन्म दिल्याची नोंद आहे.
चौकट- एचआयव्हीची माहिती देण्यासाठी सोशल मीडियावर विविध व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. एड्स जनजागृतीसाठी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने कोरोनाचे नियम पाळून मास्क डिझाइनिंग, जीआयएफ, मिम्स, सेल्फी विथ स्लोगन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील २० गावांत एचआयव्ही, एड्सबद्दल जनजागृती वाॅल पेंटिंग व पाेस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३७४ एचआयव्ही रुग्ण उपचार घेत असून यामध्ये ४६० बालकांचा समावेश आहे.
गरोदर मातांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढले
एड्स नियंत्रण विभागाकडून ज्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची भीती जास्त आहे. अशा ठिकाणी तपासणी व समुपदेशन केले जाते. शिवाय आता प्रत्येक गरोदर मातेची चाचणी केली जात असल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे.
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी
एचआयव्हीबाधित महिला गरोदर असल्यास तिने वेळेवर औषधोपचार योग्य आहार घेणे गरजेचे आहे. सहा महिने बाळाला अंगावर पाजले पाहिजे. नियमित तपासणी व आरोग्य सल्ला घेणे आवश्यक असून, त्यामुळे निगेटिव्ह बाळ जन्माला येते.
एचआयव्ही, एड्स जनजागरणासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरम्यान, मागील तिमाहीच्या काळात एका पाॅझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिल्याची नोंद आहे. तसेच गरोदर मातांच्या एचआयव्ही चाचण्या अनिवार्य केल्याने या चाचण्यांची संख्या वाढत आहे.
- डॉ. वाकोडे, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी, नांदेड