शिवशाहीला तेलंगणा एसटी प्रशासनाकडून सापत्न वागणूक; थांबण्यासाठी पॉर्इंटही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 07:21 PM2018-02-06T19:21:09+5:302018-02-06T19:23:46+5:30
नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळाकडून शिवशाही बसेसबाबत सापत्न वागणूक दिली जात आहे़
- श्रीनिवास भोसले
नांदेड : नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळाकडून शिवशाही बसेसबाबत सापत्न वागणूक दिली जात आहे़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यभरात आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत़ खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांना मिळणार्या सुविधा आणि आरामदायी गाड्यांच्या तुलनेत एसटीचा प्रवास नकोसा होत होता़ त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यभर शिवशाही वातानुकूलित गाड्या लांब पल्ल्यासाठी सुरू करण्यात आल्या़ अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड विभागात दाखल झालेल्या शिवशाही बस नांदेड - हैदराबाद- नांदेड मार्गावर सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला़ परंतु, पहिल्याच दिवशी राज्य सीमेवर कागदपत्रांच्या नावावर निजामाबाद आरटीओंनी शिवशाहीची अडणूक केली़ हे ग्रहण कायम असल्याचे चित्र आजही पहायला मिळत आहे़ तेलंगणा राज्यात गरूडा, इंदिरा, राजधानी आदी वातानुकूलित गाड्या निजामाबाद ते हैदराबाद मार्गावर चालविण्यात येतात़
निजामाबाद बसस्थानकात वातानुकूलित बसेस उभ्या करण्याचा स्वतंत्र पॉर्इंट असल्याने प्रवासीदेखील त्याच ठिकाणी थांबतात, परंतु शिवशाही गाड्या वातानुकूलित असून याठिकाणी उभ्या करू दिल्या जात नाहीत़ त्यामुळे चालक, वाहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्याचबरोबर अपेक्षित प्रवासीदेखील मिळत नाहीत़ शिवशाही गाड्यांना नांदेड ते निजामाबाददरम्यान प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आहे़ तर निजामाबाद ते हैदराबाद या मार्गावर बर्यापैकी प्रवासी मिळत असल्याचे काही वाहकांनी सांगितले.
नांदेड-हैदराबाद मार्गावर दररोज सहा शिवशाही गाड्या सोडण्यात येत आहेत़ प्रत्येक गाडीला दिवसाकाठी किमान ३९ ते ४० हजार उत्पन्न अपेक्षित आहे, परंतु प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने केवळ ३० ते ३२ हजार रूपये उत्पन्न होत आहे. नांदेड येथून हैदराबादसाठी रात्रीला पॅसेंजर व इतर एक्स्प्रेस रेल्वे आहेत़ कमी तिकिटात आरामदायी प्रवास असल्याने प्रवासी रेल्वे प्रवासालाच पसंती देतात़ त्यामुळे नांदेड-हैदराबाद मार्गावर धावणार्या शिवशाही गाड्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण आहे़
पुणे, मुंबई प्रवाशांना शिवशाहीची प्रतीक्षा
नांदेड येथून पुणे, मुंबईला दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ नांदेड-पुणे मार्गावर चाळीस ते पन्नास खाजगी ट्रॅव्हल्स धावतात़ दिवाळी, उन्हाळी सुट्यांमध्ये चार ते पाच पट तिकीट घेवून खाजगी कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते़ नांदेड-पुणे मार्गावर शिवशाही सुरू करण्याची गरज असताना एसटी प्रशासनाने या मार्गाकडे दुर्लक्ष केले आहे़ मुंबई, पुणे मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे मागणी असूनही रेल्वे सोडली जात नसल्याचा आरोप नेहमीच होतो़ त्याचप्रमाणे एसटीचेही संबंध असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.