नांदेड जिल्ह्याला अवकाळीचा दणका; बारा मंडळात अतिवृष्टी; पिके पाण्याखाली
By प्रसाद आर्वीकर | Published: November 27, 2023 03:06 PM2023-11-27T15:06:18+5:302023-11-27T15:13:33+5:30
जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस
प्रसाद आर्वीकर, नांदेड: जिल्ह्यात रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने दणका दिला असून, बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे अनेक भागात पिके पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला.
या पावसाने शेत शिवारात पाणी साचले आहे. हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेले असून उसाच्या पिकालाही फटका बसला आहे.जिल्ह्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, नांदेड तालुक्यातील लिमगाव मंडळात सर्वाधिक ९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड शहर परिसरात ६८, तरोडा मंडळात ८२.३०, नाळेश्वर ७०.८०, अर्धापूर तालुक्यांत अर्धापूर ७७.५०, दाभड ६९, कंधार तालुक्यातील उस्माननगर ७६.३०, लोहा तालुक्यातील सोनखेड ७६.३०, कलंबर ७६.३०, शेवडी ७४, हदगाव तालुक्यातील तामसा ६५.३० आणि पिंपरखेड मंडळामध्ये ६५.३० मिलिमीटर पाऊस झाला. या सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन तासांमध्ये सरासरी ३६.५० मिलिमीटर पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक ६७.३०मिली पावसाची नोंद झाली.