बाभळी कोरडीठाक, पाणी गेले तेलंगणात, मुख्यमंत्री स्तरावर तोडग्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:38 AM2020-07-10T06:38:30+5:302020-07-10T06:39:31+5:30
नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत.
- विशाल सोनटक्के
नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ जुलैला बाभळी धरणाचे १४ दरवाजे उघडून सुमारे ३२ टक्के पाणी तेलंगणात सोडल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असलेला बाभळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़ नियमांच्या जटीलतेमुळे महाराष्ट्रावर गरजेच्यावेळी पाणी सोडण्याची नामुष्की येत असल्याने ‘बाभळी’चे काटे आता टोचू लागले आहेत़ या प्रश्नी मुख्यमंत्रीस्तरावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे़
...मग धरणाचा उपयोग काय?
महाराष्ट्र व तेलंगण यांच्यामध्ये बाभळी बंधारानिर्मितीवरुन मोठा वाद झाला होता़ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाने निकाल देत १ जुलैला बाभळीचे दरवाजे उघडावेत व १ आॅक्टोबरला दरवाजे बंद करावेत, असे निर्देश दिले़
उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यापैकी ०़६० टी़एम़सी़ पाणी दरवर्षी १ मार्चला तीव्र पाणी टंचाई असताना सोडावे लागते़ त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन बांधलेल्या धरणाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
बाभळी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याची मागणी होत आहे़ मात्र ही वेळ खाऊप्रक्रिया आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागण्याची तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी बैठक घेवून तोडगा काढण्याची मागणी केली होती़ - प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार,
सचिव, बाभळी संघर्ष समिती