बळीराजाचे आभाळाकडे डोळे; नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: June 19, 2024 07:31 PM2024-06-19T19:31:50+5:302024-06-19T19:32:13+5:30
जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला तरी अजूनही पेरणी करण्यायोग्य पावसाचा पत्ता नाही.
नांदेड : जिल्ह्यातील काही तालुक्यांत थोडा पाऊस पडल्याने आजपर्यंत पाच तालुक्यांत १२ हजार ९७० हेक्टरवर म्हणजे प्रस्तावित क्षेत्राच्या केवळ १.६९ टक्के पेरणी झाली आहे. तर जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी अद्याप मोठा पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तब्बल ७ लाख ७४ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यात ४ लाख ५३ हजार हेक्टर सोयबीनसाठी, तर २ लाख १० हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकांची लागवड होईल. याशिवाय तूर, ज्वारी, सूर्यफूल या अन्य पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. काही भागात शेतकऱ्यांनी काळ्या पाण्यावरच कापसाची लागवड केली असून, सोयाबीन व अन्य पिकांच्या पेरण्या मात्र झालेल्या नाहीत.
जिल्ह्यात १८ जूनपर्यंत नांदेड ५० हेक्टर, अर्धापूर १० हेक्टर, देगलूर १७३४ हेक्टर, किनवट ७६३० हेक्टर, भोकर ३५३२ हेक्टर, तर उमरी तालुक्यात केवळ १४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे. किनवट तालुक्यात सर्वाधिक ९.७८ टक्के, तर त्याखालोखाल भोकर तालुक्यात ७.५७ टक्के पिकांची तर एकूण १.६९ टक्केच पेरणी झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १५६९ हेक्टरवर कापसाची लागवड केलेली असून, ४० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे, तर रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे काही तालुक्यांत सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे.
शेतक-ऱ्यांचे आभाळाकडे डोळे
शेतकऱ्यांनी खत, बियाणांची जुळवाजुळव करून ठेवली असून, जमिनीची मशागतही केलेली आहे. पण, जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला तरी अजूनही पेरणी करण्यायोग्य पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसासाठी आभाळाकडे डोळे असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
पेरणीला झाला होता दीड महिना उशीर
जिल्ह्यात रविवारी काही तालुक्यांत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी पेरणीला सुरुवात केली. पण, अनेक भागात पेरणीयोग्य पाऊसच पडला नसल्याने इतर भागातील पेरण्या खोळंबल्या. गतवर्षीही उशिराने पाऊस झाल्यामुळे तब्बल एक ते दीड महिना पेरणीला उशीर झाला होता.
मागील वर्षापेक्षा ६३ मिमी अधिक पाऊस
जिल्ह्यात यंदा पेरणीयोग्य पाऊस पडला नसला तरी गतवर्षीच्या तुलनेत सरासरी तब्बल ६३ मिमी अधिक पाऊस पडला आहे. यावर्षी १८ जूनपर्यंत सरासरी ७३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. तर गतवर्षी केवळ सरासरी १०.८० मिमी इतकाच पाऊस झाला होता. यावर्षी पावसाची टक्केवारी अधिक असली तरी पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.