नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर यंदाही बोंडअळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:45 AM2018-07-12T00:45:51+5:302018-07-12T00:46:37+5:30

जिनिंग मिलमध्ये फेरोमेन तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Bandhali crisis in front of farmers of Nanded district this year too | नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर यंदाही बोंडअळीचे संकट

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर यंदाही बोंडअळीचे संकट

Next
ठळक मुद्देशेंदरीचे पतंग पुन्हा आढळल्याने चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शेंदरी बोंडअळीच्या हाहाकाराचा फटका मागील वर्षी जिल्ह्यातील १५ तालुक्यांना सोसावा लागला होता. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सध्या भरपाईचे वाटप सुरू असतानाच यंदाही जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोंडअळीचा धोका कायम असल्याचे पुढे आले आहे. जिनिंग मिलमध्ये फेरोमेन तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यात सव्वादोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.
जिल्ह्यात कापूस शेतकऱ्यांच्या दृष्टीने नगदी पैसे देणारे महत्त्वाचे पीक आहे. कापसाचे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ३ लाख ४१ हजार ३४२ हेक्टर एवढे आहे. मागील वर्षीही जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. मात्र शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४२ कोटी ९० लाख रुपये नुकतेच जाहीर झाले असून त्याचे सध्या बँकांमार्फत वितरण सुरू आहे. यामध्ये अर्धापूर तालुक्यातील २ हजार ३२८ शेतकऱ्यांना ८२.०२ लाख, किनवट-१५०६६ शेतकऱ्यांना ८ कोटी ७९ लाख, नांदेड- १४१४ शेतकऱ्यांना ५४.५३ लाख, माहूर- २२ गावांतील शेतकऱ्यांना ४२०.९६ लाख, लोहा- ९०९५ शेतकऱ्यांना २७५.७० लाख, हदगाव- १६०१० शेतकऱ्यांना ६१८.४५ लाख, मुदखेड- १५३९ शेतकऱ्यांना ६१.४५ लाख, मुखेड- ३४४९ शेतकऱ्यांना ९५.९२ लाख, भोकर- १०७२३ शेतकऱ्यांना ४३४.३५ लाख, बिलोली- ३४७६ शेतकऱ्यांना १३६.५७ लाख, हिमायतनगर- ७०४४ शेतकऱ्यांना ३२६.३४ लाख, देगलूर- ३२३३ शेतकऱ्यांना १६१.१३ लाख, कंधार- १०१७ शेतकऱ्यांना ३४१.१२ लाख, धर्माबाद- ४९५९ शेतकऱ्यांना १७४.७१ लाख तर उमरी तालुक्यातील ५ हजार ११७ शेतकऱ्यांना १९८.०६ लाख नुकसान भरपाई देण्यात येत असून यातील बहुतांश वाटपाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
दरम्यान, यंदाही जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात ९३ हजार ५६५ म्हणजेच सरासरीच्या २७ टक्के कापसाची लागवड पूर्ण झाली होती. तर ३ जुलैपर्यंत नांदेड जिल्ह्यातील २ लाख २ हजार ६५२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ५९ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. हे प्रमाण मराठवाड्यात सर्वाधिक आहे. सद्य:स्थितीत लातूर जिल्ह्यात २ हजार ८४४, उस्मानाबाद ३ हजार ७८०, परभणी- ६९ हजार ६४०, हिंगोली- ३१ हजार १७१, औरंगाबाद १ लाख ८४ हजार ६०२, जालना- ८१ हजार २३६ तर बीड जिल्ह्यात १ लाख ३० जार ६५ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे.
मात्र जिनिंग मिलमध्ये फेरोमेन सापळे तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचा पतंग आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. चालू हंगामात कापूस पिकावरील बोंडअळी नियंत्रणाच्या दृष्टीने जुलै व आॅगस्ट महिने महत्त्वाचे असल्याचेही कृषी संचालक विजय घावटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
----
बोंडअळी व्यवस्थापनासाठी या उपाययोजना करा
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे त्यांनी पाते लागण्याच्या वेळेस प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ५ टक्के लिंबोळी अर्काची फवारणी करणे आवश्यक आहे. लिंबोळी अर्काची फवारणी हा सर्वात स्वस्त व सहजसाध्य उपाय आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून तालुका पातळीवर तातडीने सर्वेक्षण व मास ट्रपिंगसाठी फेरोमीन सापळे उपलब्ध करुन घ्यावे. त्याचा वापर केल्यास बोंडअळीवर नियंत्रण येते. तसेच भविष्यात होणारा किडीचा प्रसार रोखला जातो.

Web Title: Bandhali crisis in front of farmers of Nanded district this year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.