बँकेत दरोड्याचा होता कट; सर्व आरोपी नांदेडचे रहिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:45 AM2018-10-17T00:45:17+5:302018-10-17T00:45:51+5:30
शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या़ तर पाच जण अंधाराचा फायदा घेवून पळाले़ पळालेले सर्व आरोपीही नांदेडचेच रहिवासी असून गोदावरी अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर दरोडा टाकण्याचा त्यांचा कट होता़ परंतु तत्पूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या़ तर पाच जण अंधाराचा फायदा घेवून पळाले़ पळालेले सर्व आरोपीही नांदेडचेच रहिवासी असून गोदावरी अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर दरोडा टाकण्याचा त्यांचा कट होता़ परंतु तत्पूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले़
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विनोद दिघोरे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली़ यावेळी आरोपीकडून देशी कट्टे, एअरगन, बारा बोअरची रायफल जप्त करण्यात आली असून जगदिशसिंघ ऊर्फ जग्गी संधू, करणसिंघ ऊर्फ किरण बावरी व राहुल सुभाष ठाकूर या तिघांना पोलिसांनी पकडले होते़ त्यांच्या चौकशीत हे सर्व गोदावरी अर्बन बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आली आहे़ तर अंधाराचा फायदा घेत पळून गेलेल्यांमध्ये मनप्रितसिंघ ऊर्फ सोनू सुजानसिंघ अवलोक राग़ुरुद्वारा परिसर, रघुसिंग उर्फ रग्या राजेंद्रसिंघ बावरी रा़मुरमुरा गल्ली, कौठा, शिवा चव्हाण राख़ोब्रागडेनगर, शेरु खैरे व राजू महाराज यांचा समावेश आहे़ हे सर्व आरोपी नांदेडचेच रहिवासी आहेत़
त्यांच्याजवळ सापडलेल्या शस्त्रसाठ्यावरुन ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज पोलिसांना आला होता़ दरम्यान, अटकेतील आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे़
दिघोरेंची धाडसी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि विनोद दिघोरे यांनी गेल्या काही दिवसांत खुनाचे पाच प्रकरणे उघडकीस आणले आहेत़ त्याचबरोबर अनेक अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत़ कुख्यात रिंधा याच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या जगदिशसिंघ ऊर्फ जग्गी याच्या मागावर अनेक दिवसांपासून दिघोरे यांचे पथक होते़