बँका भावी प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंमलबजावणीस माहुरात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:25 PM2018-01-09T17:25:10+5:302018-01-09T17:25:39+5:30
तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात बँक शाखेचे जाळे नसल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले खाते उघडण्यास अडचण निर्माण होत आहे़
- नितेश बनसोडे
श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात बँक शाखेचे जाळे नसल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले खाते उघडण्यास अडचण निर्माण होत आहे़
गरीब, आदिवासी गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे़ तालुक्यातील ग्रामीण भागात पुरेशा बँक अद्यापही पोहोचल्या नसल्याने केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून अनेकांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. माहूर येथे स्टेट बँक आॅफ इंडियाची एक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एक अशा दोन शाखा आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावरील गर्भवती महिलांना बँक खाते काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते़ यामुळे गर्भवती महिलांना त्रास सहन करून योजनेचा लाभ घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़
तालुक्यातील खेडेगावांत बहुतेक महिला घरीच प्रसूत होतात़ त्यामुळे मातामृत्यू व नवजात शिशू दगावण्याच्या संख्येतही मोठी वाढ होण्याची शक्यता असते़ खाजगी दवाखान्यात सिझेरीयन तसेच प्रसूतीचा खर्च न परवडणारा असतो़ त्यामुळे मोलमजुरी करून आपले पोट भरणा-या या गरीब, आदिवासी महिलांना घरीच प्रसूती करण्याशिवाय पर्याय नसतो़ दुर्गम भागातील गरोदर महिलांना प्रसूतीचा खर्च, आवश्यक खाद्य पुरवण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे़ परंतु विविध प्रकारच्या अडचणींमुळे ही योजना अद्याप दुर्गम भागातील लाभार्थिंपासून कोसोदूर असल्याचे चित्र तालुक्यात आहे़ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून योजना राबविण्यासाठी उत्तम काम बजावण्यात येत आहे़ यात शंका नाही़ मात्र बँकेबाबत अडचणी निर्माण होत आहेत़
कागदपत्रांची जुळवाजुळव
योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते उघडणे महत्त्वाचे आहे़ या योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी लाभार्थिच्या बँक खात्यात जमा होत असतो़ बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड आदी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. माहूर तालुक्यातील काही गावांतील लाभार्थी ही सर्व कागदपत्रे नसल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे़ बँक प्रशासनही अनेकवेळा टाळाटाळ करून लाभार्थिंना पिटाळून लावत असल्याचाही आरोप होत आहे़
योजनेचे काम सुरु आहे
१५ डिसेंबर २०१७ पासून योजनेला सुरुवात झाली असून ३ जानेवारी २०१८ पर्यंत ४७ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आॅनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात आले. योजनेचा लाभ तळागाळापर्यंत मिळावा यासाठी आशा कार्यकर्ती, आरोग्यसेविका यांचे कार्य सुरु आहे
-साहेबराव भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, माहूऱ
काय आहे योजना ?
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर लाभार्थी मातांना तीन टप्प्यात ५ हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येत असते़ पहिल्या टप्प्यात गरोदर मातांची तपासणी लवकरात लवकर (१५० दिवसांच्या आत) नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपये सहा महिन्यानंतर परंतु किमान गरोदरपणात एक तपासणी झाल्यानंतर दोन हजार रुपये व बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला १४ आठवड्यापर्यंत किमान बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आदी प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर २ हजार रुपये असे एकूण ५ हजार रुपयांचा निधी मातेच्या बँक खात्यात वितरीत करण्यात येत असतो़ दरम्यान, याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थिंना त्या योजनेच्या निकषानुसार अतिरिक्त लाभ देण्यात येत असतो़ या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थिंना हा लाभ थेट हस्तांतरण पद्धती म्हणजे डीबीटीमार्फत खात्यावर जमा करण्यात येत असतो.