हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा स्मशानभूमी दुर्लक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:40 AM2018-10-03T00:40:13+5:302018-10-03T00:41:19+5:30
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असतानाही जिल्हा परिषद या प्रश्नाबाबत ढीम्मच असल्याचे दिसून येते. जिल्हा वार्षिक योजनेतून दहन व दफनभूमीसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र यातील अवघ्या एका स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून चार कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित १६ कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असतानाही जिल्हा परिषद या प्रश्नाबाबत ढीम्मच असल्याचे दिसून येते. जिल्हा वार्षिक योजनेतून दहन व दफनभूमीसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र यातील अवघ्या एका स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून चार कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित १६ कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला होता. या ठिकाणच्या मागासवर्गीय समाजबांधवांना अंत्यविधीसाठी इतर ठिकाणी जागा नसल्याने शाळेसमोरील जागेतच अंत्यविधी केला जात आहे. या स्मशाभूमीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असतानाच स्मशानभूमीच्या एकूणच प्रश्नासंदर्भात प्रशासन उदासीन असल्याचेही दिसून येते. जिल्ह्यात विविध ठिकाणी स्मशानभूमीची आवश्यकता असून काही ठिकाणी दुरुस्तीच्या कामाचीही गरज ग्रामस्थांतून वारंवार व्यक्त केली जाते.
जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन २०१७-१८ अंतर्गत दहन व दफनभूमीच्या २१ कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यात नांदेड पंचायत समितीअंतर्गत ४, अर्धापूर ५, कंधार, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, हदगाव पंचायत समितीअंतर्गत प्रत्येकी १ तर मुखेड, हिमायतनगर आणि माहूर पंचायत समितीअंतर्गत प्रत्येकी २ अशा २१ कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या कामांसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. यात नांदेड येथील ४ कामांसाठी १८ लाख १० हजार, अर्धापूर ६५ लाख, कंधार ४ लाख १० हजार, मुखेड १७ लाख १० हजार, देगलूर, हदगाव प्रत्येकी ५ लाख, बिलोली,नायगाव, धर्माबाद प्रत्येकी ४ लाख १० हजार तर हिमायतनगर ८ लाख २० हजार आणि माहूर येथील दोन कामांसाठी १० लाखांच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र यातील केवळ अर्धापूर पंचायत समितीकडून स्मशानभूमीची पाच कामे सुरु करण्यात आली असून त्यातील एका कामाला अद्याप सुरुवात झालेली नसली तरी उर्वरित चार कामे प्रगतीपथावर आहेत.
मंजृूर ६५ लाखांपैकी ६० लाखांचा निधी अर्धापूर पंचायत समितीने खर्चही केला आहे. नांदेड पंचायत समिती अंतर्गतचे एक काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र इतर पंचायत समित्यांनी अद्यापही स्मशानभूमीची कामे सुरु केलेली नाहीत. निधी मंजूर असूनही जिल्ह्यातील १६ कामांना सुरुवात झालेली नाही. यात नांदेड पंचायत समितीअंतर्गत ३, अर्धापूर, कंधार, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, हदगाव या पंचायत समितीअंतर्गतचे प्रत्येकी एक तर मुखेड, हिमायतनगर आणि माहूर पंचायत समिती अंतर्गतच्या प्रत्येकी दोन कामांना अद्याप मुहूर्तही लागलेला नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
कानाडोळा : कामांना गती मिळणार कधी ?
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचे ‘लोकमत’ ने पुढे आणले. अशाच प्रकारची अवस्था जिल्ह्याच्या इतर भागातही आहे. स्मशानभूमी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच जेथे स्मशानभूमीची मागणी आहे तेथे उभारणीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. मात्र एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे स्मशानभूमीच्या २१ कामांना मंजुरी मिळालेली असतानाही आणि त्यासाठी तब्बल १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात कामे सुरु होत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.