जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:07+5:302021-02-05T06:08:07+5:30
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणूक न घेता या संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र ...
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणूक न घेता या संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थानिक स्तरावर सुरू झाली आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत आल्याने मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या यादीचे नवीनीकरण करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्या व अन्य पात्र स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मतदार प्रतिनिधीच्या नावाची शिफारस करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया थांबली होती. आता सहकार प्राधिकरणाने निवडणुकीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बहुतांश आक्षेप सेवा सहकारी सोसायट्यांनी पाठविलेल्या ठरावावर घेतल्याचे दिसते. थकबाकीदार सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांना मतदान करता येणार नसले तरी बऱ्याच सोसायटींनी संचालकांच्या नावांची शिफारस केली आहे. प्रत्यक्षात थकबाकीदार सेवा सहकारी सोसायट्यांना त्यांच्या सभासदांची मतदार म्हणून शिफारस करता येते. त्यामुळे थकबाकीदार सोसायट्यांच्या संचालकांच्या मतदार यादीतील नावावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत.