नापिकी, कर्जबाजारीपणाने नैराश्य; गुढी पाडव्यादिवशीच शेतकऱ्याने संपवले जीवन
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: March 22, 2023 07:18 PM2023-03-22T19:18:11+5:302023-03-22T19:18:29+5:30
शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे?
मारतळा (जि. नांदेड) : लोहा तालुक्यातील हातणी येथील एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. ही दुर्घटना २२ मार्च रोजी गुढी पाडव्यादिवशी सकाळी घडली.
हातणी (ता. लोहा) येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश दादाराव कदम (वय २८) याने सततची नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
उस्माननगर पोलिसांना ही माहिती मिळताच फौजदार प्रभू केंद्रे, जमादार राम कानगुले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास उस्मान नगर पोलिस करीत आहेत.
एक वर्षापूर्वीच झाले लग्न
मृत गणेश याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या नावे तीन एकर शेती असून, त्याच्यावर बँकेचे पीक कर्ज होते. त्यातच तो थकबाकीदार झाला. शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे? या विवंचनेने या तरुण शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपविली.