जीर्णोद्धार करताना सापडला अतिप्राचीन शिवमंदिराचा तळ, चालुक्यकालीन नगरी होट्टल येथे पुरातत्व विभागाकडून संवर्धनाचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 08:20 AM2024-06-12T08:20:32+5:302024-06-12T08:21:03+5:30
Nanded News: देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी होट्टल येथील अद्भुत शिल्पकला व वास्तुकलांचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिरांच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.
- शेख शब्बीर
देगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी होट्टल येथील अद्भुत शिल्पकला व वास्तुकलांचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिरांच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान जीर्णोद्धार सुरू असलेल्या एका मंदिराजवळ ढिगारा साफ करताना भगवान शिवमंदिराचा तळ सापडला आहे. त्यातील पिंड व मूर्ती बघून सर्व अवाक् झाले.
मंदिरे दहाव्या व अकराव्या शतकातील
होट्टल येथील सिद्धेश्वर (महादेव मंदिर), रेब्बश्वर (पार्वती मंदिर), परमेश्वर मंदिर व त्याचे बारव, सोमेश्वर मंदिर व त्याचे बारव यांच्या दुरुस्तीचे काम राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली ही चारही मंदिरे दहाव्या व अकराव्या शतकातील असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
चार खंदक खोदले अन्...
- सोमेश्वर (नंदी मंदिर तथा कुंड) मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना ढिगारा साफ करतेवेळी पुरातत्व विभागास याठिकाणी नव्या मंदिराचा पाया दिसून आला. याची पडताळणी करण्यासाठी चार खंदक खोदण्यात आले असता याठिकाणी भगवान शिवमंदिराचा पाया सापडला.
- त्यामध्ये दोन मूर्ती व पिंड हाती लागले आहे. तसेच छोट्या मोठ्या मूर्ती, कोरलेले दगड, मंदिराचे बरेचसे भाग या शिवाय मोठ्या प्रमाणात विटा सापडल्या आहेत. याठिकाणी महादेवाचे बारा ज्योतिर्लिंग सापडू शकतात असा अंदाजही गावकऱ्यांमधून वर्तविला जात आहे.