वाडी-वस्त्यांना ‘काळीपिवळी’चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:47+5:302021-06-25T04:14:47+5:30
नांदेड विभागांतर्गत जिल्ह्यात ३६५ बसच्या माध्यमातून जवळपास दीड हजार बसफेऱ्या करून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. डिझेलच्या दरात वाढ ...
नांदेड विभागांतर्गत जिल्ह्यात ३६५ बसच्या माध्यमातून जवळपास दीड हजार बसफेऱ्या करून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ज्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी अधिक आहे, अशाच ठिकाणावर बसेस सोडल्या जात आहेत. त्यात शाळा बंद असल्याने गाव-खेड्यात पोहोचलेल्या मानव विकास मिशनच्या बसेसही बंदच आहेत. आजघडीला नांदेडमध्ये जवळपास ९ आगारात १३० पेक्षा अधिक बसेस उभ्या आहेत. प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात डिझेलच्या दरात वाढ झाल्याने खासगी वाहनांच्या तिकीट दरातही वाढ झाली असून वाहनाची भरती होईपर्यंत थांब्यावरच थांबावे लागत असल्याने प्रवाशांचा वेळही जात आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना एसटी बससेवेचाच आधार असतो. त्यात गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक प्रमाणात बसचा प्रवास केला जातो. त्यामुळे बसेस सुरू झाल्याने दिलासा मिळत आहे.
- सखाराम भांगे, प्रवासी.
बसेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांना आधार मिळत आहे; परंतु बस प्रशासनाने सुविधा पुरविण्याकडेही लक्ष द्यावे, भंगार बसेस काढून नवीन बसेस सुरू कराव्यात, तसेच लांबपल्ल्यासाठी वातानुकूलित बसेसचीही सुविधा देण्याची गरज आहे.
- महेश पाटील, प्रवासी.