किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:41 AM2019-01-02T00:41:31+5:302019-01-02T00:46:40+5:30
लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़
नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़
आ़प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, किवळा साठवण तलावाला मंजुरी देण्यासाठी २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागणी केली होती़ त्यानंतर २० मे २०१८ रोजीच्या बैठकीत या साठवण तलावाचा प्रस्ताव मंजूर करुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ परंतु, साठवण तलावाचा खर्च महापालिका प्रशासनाने करावा, अशी अट टाकण्यात आली होती़ परंतु या तलावाचा खर्च करण्याची क्षमता महापालिकेत नसल्याचे पत्र आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले होते़ त्यामुळे या तलावाचे काम रखडले होते़ त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हे काम जलसंपदा विभागा मार्फत करण्यात यावे, अशी मागणी केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते़
मुख्य अभियंत्यांनी पंचम सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबतची अट रद्द करुन तलावाचा सर्व खर्च जलसंपदा विभागाने करावा यास मान्यता दिली़ त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साठवण तलावास मंजुरी देण्यात आली असून ४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ अशी माहिती आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली़
तर किवळा साठवण तलावाला फडणवीस सरकारने मंजूर दिली अशी खोटी माहिती देवून आ़प्रताप पाटील चिखलीकर हे जनतेची दिशाभूल करीत असून या साठवण तलावाची मंजुरी निविदा आणि कार्यारंभ आदेश मागील आघाडी सरकारच्या काळात आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून निघाले़ अशी माहिती माजी आ़ शंकर धोंडगे यांनी दिली़
पत्रपरिषदेत धोंडगे म्हणाले, गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णूपुरीवरील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होवून विष्णूपुरी पूर्णपणे शेतीसाठी उपयोगात येईल़ या हेतूने आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी घेण्यात आली होती़ त्यामध्ये अंतेश्वर बंधारा पूर्ण झाला़ किवळा साठवणाला पाण्याचा येवा कमी असल्यामुळे पावसाळ्यात विष्णूपुरी जेव्हा ओव्हर फ्लो होते़ त्या काळात इन्फ्लोमधून तलाव भरुन नंतरच्या काळात एमआयडीसी, सिडको, हडको व कृष्णूर एमआयडीसीला वर्षभर पाणी पुरवठा करता येतो़
या संकल्पनेतून किवळ्याला १६ मे २०१२ रोजी निविदा मंजुरी व २७ जून २०१३ ला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला़ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधीही दिला होता़ असे असताना चिखलीकर मात्र भाजप सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही धोंडगे यांनी केला आहे़
त्यामुळे एवढी वर्षे रखडलेल्या या पुलाला निधी मंजूर होताच विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत़ आगामी काळात हा वाद आणखी वाढत जाणार आहे़
- आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता लोहा-कंधार मतदारसंघासाठी किवळा साठवण प्रकल्पाचा मुद्दा सर्वांसाठीच महत्त्वाचा झाला आहे़ येत्या काळात माजी आ़शंकर धोंडगे आणि विद्यमान आ़प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगणार असल्याचे दिसते़