'व्हॅलेंटाईन डे को मेरी गर्लफ्रेंड बनो'; विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा
By शिवराज बिचेवार | Updated: February 14, 2023 16:58 IST2023-02-14T16:57:45+5:302023-02-14T16:58:22+5:30
महाविद्यालयात सोबत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीची व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो असे म्हणून पाठलाग केला.

'व्हॅलेंटाईन डे को मेरी गर्लफ्रेंड बनो'; विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा
नांदेड- एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाई व्हॅलेंटाईन डे च्या प्रतिक्षेत असतात. परंतु एकतर्फी प्रेमातून अनेक वाईट घटनाही या दिवशी घडतात. शहरातील वजिराबाद भागात अशीच एक घटना घडली.
महाविद्यालयात सोबत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीची व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो असे म्हणून पाठलाग केला. या प्रकरणात पिडीतेच्या तक्रारीवरुन या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत आहे. परंतु नांदेडात या दिवसाच्या पूर्वसंध्येला वजिराबाद पोलिस ठाण्यात एका तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
सोमवारी १३ फेब्रुवारीला वजिराबाद भागात असलेल्या एका महाविद्यालयात अल्पवयीन तरुणी शिक्षण घेत होती. सकाळी साडे आठ वाजता ती महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजता महाविद्यालयाच्या पायऱ्या उतरत असताना त्याच महाविद्यालयातील आदी आझाद बागडीया (१८) हा तरुण तिच्याजवळ आला. व्हॅलेंटाईन डे आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो. तुम मुझे बहोत पसंद हो, असे म्हणत या विद्यार्थीनीचा पाठलाग केला. त्यानंतर पिडीतेने घरी आल्यानंतर ही बाब आईला सांगितली. आईने थेट वजिराबाद पोलिस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली. त्यावरुन आदी बागडीया या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणाचा तपास पोउपनि गिरे करीत असल्याची माहिती पोनि.जगदिश भंडरवार यांनी दिली.