ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यास सज्ज राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:35+5:302020-12-24T04:17:35+5:30
नांदेड - गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून शिवसैनिकांनी गावागावात भगवा फडकविण्यास सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे ...
नांदेड - गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून शिवसैनिकांनी गावागावात भगवा फडकविण्यास सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड येथे आज बुधवारी आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आनंद जाधव, माजी आ. रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोन्डारकर आदी उपस्थित होते. यावेळी संजय राठोड यांनी ग्रामपंचायतींची ही निवडणूक शिवसैनिकांनी गाव तेथे शिवसेना या धर्तीवर ‘घर तेथे शिवसैनिक’ या ध्येयाने लढवावी. तसेच ग्रामपंचायतीत शिवसेनेचे अधिकाधिक पदाधिकारी निवडून येतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. नांदेड जिल्ह्यात एक हजार १५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी शिवसेना हा महत्त्वाचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत पक्षाची उत्तम कामगिरी झाली पाहिजे, अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली.
संजय राठोड यांनी यावेळी नांदेड जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. शिवसैनिकांना तपशीलवार सूचना करून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना केल्या. शिवसेनेच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांच्या सोबत पूर्ण क्षमतेने ग्रामपंचायतीत यश मिळविण्यासाठी काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी भुजंग पाटील, धोंडूदादा पाटील, डॉ. मनोजराज भंडारी, युवासेनेचे माधव पावडे, महिला आघाडीच्या डॉ. निकिता चव्हाण, प्रकाश मायदर, सचिन किनवे, शहरप्रमुख सचिन नाईक आदींसह शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते व शिवसैनिक उपस्थित होते.