अस्वलाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचे दोन्ही डोळे निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:54 PM2019-12-06T12:54:11+5:302019-12-06T12:56:31+5:30
प्रतिकार करून आरडाओरड केल्याने अस्वलाने जंगलात ठोकली धूम
किनवट (जि़नांदेड) : शेतातील कापूस व तूर या पिकांची रखवाली करणाऱ्या शेख जावीद शेख मुबारक या २७ वर्षीय विवाहित युवा शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला़ यामध्ये सदर युवक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. ही घटना ५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मलकवाडी जंगलालगतच्या शेतात घडली़
शेख जावीद (रा़ चिखली (बु), ता. किनवट) हा युवा शेतकरी मलकवाडी शिवारातील शेतात ५ डिसेंबर रोजी दुपारच्यावेळी तूर व कापूस या पिकांची रखवाली करीत होता़ दरम्यान, शेतालगत असलेल्या जंगलातून आलेल्या अस्वलाने अचानक येऊन हल्ला केला़ यामध्ये तो गंभीर जखमी झाला़ तसेच त्याचे दोन्ही डोळे अस्वलाने निकामी केले़
जेंव्हा अस्वलाने शेख जाविदवर हल्ला केला तेव्हा त्याने प्रतिकार केल्यामुळे अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या जावीदने मोबाईलवरून मित्रांना फोन केला. त्याआधी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेख जाविद यास तात्काळ गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ तेथे डॉ़ आऱएस़ ढोले यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलविले आहे़ या घटनेमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात शेख यांचा एक डोळा जागेवरच निकामी झाला़ तर दुसराही डोळा उपचारादरम्यान निकामी झाला असल्याचे डॉ़ ढोले यांनी सांगितले़
पाच हजारांची मदत
या घटनेची माहिती मिळताच वनपाल के़जी़ गायकवाड, आऱजी़ सोनकांबळे, एस़एम़ सांगळे, एस़बी़ संतवाले, संभाजी घोरबांड यांनी जखमीला पाच हजार रुपयांची तातडीची मदत केली़ वन्य प्राण्यांनी जंगला लगतच्या शेत शिवारात येऊन पिकांचे नुकसान चालवले आहे़ े वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़
जखमी अवस्थेत शेख जावीदने केला मित्रांना फोन
अस्वलाने हल्ला चढविल्यानंतर शेख यांनी आरडाओरडा करीत अस्वलाचा प्रतिकार करून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली़ यानंतर मोठ्या धाडसाने जखमी अवस्थेत मित्रांना फोन करून बोलावून घेतले़ च्त्याआधी कापूस वेचणी करणारे शेजारी धावून आले़, परंतु अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेख यास दोन्ही डोळे गमवावे लागले़