मॉर्निंग वॉकला निघालेल्या ज्येष्ठ पत्रकारास मारहाण; चाकूच्या धाकावर लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 11:28 AM2022-01-08T11:28:15+5:302022-01-08T11:29:35+5:30
शहरातील डीमार्ट परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या आणि वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत.
नांदेड : मॉर्निंग वॉकला निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण करत व चाकूचा धाक दाखवत लुबाडले. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजता घडली.
शहरातील डीमार्ट परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या आणि वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत. कॅनॉल रोड परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी हजारो महिला नागरिक पहाटे रस्त्यावर असतात. परंतु, पहाटे पाच ते सहा या वेळेत रस्त्यावर असणारी तुरळक गर्दी आणि अंधाराचा फायदा घेत लुटमार केली जात आहे. शनिवारी पहाटे ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी आणि त्यांचे मित्र पाटील हे छत्रपती चौक ते डी मार्ट रस्त्यावर वॉकिंग करत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील महागडा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चोरटे पसार झाले. दरम्यान, यासंदर्भात भाग्यनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तत्पूर्वी घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्याचा शोध लावला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही घडले असे प्रकार
छत्रपती चौक ते निळा टी पॉईंट या कॅनॉल रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी असल्याने नागरिक वॉकिंगसाठी या रस्ताला पसंती देतात. सायंकाळी आणि पहाटे या रस्त्यावर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु मागील काही दिवसांत वाढलेल्या लुटमारीच्या घटनांमुळे वॉक करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी वॉक करणाऱ्या एका शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरट्यांनी लांबविले होते. त्याचबरोबर चाकूचा धाक दाखवून मोबाईल काढून घेण्याच्या अनेक घटना घडल्या. परंतु बहुतांश घटना रेकॉर्डवर नाहीत.
अंधारामुळे वाढले प्रकार
छत्रपती चौक ते निळा टी पॉईंट हा रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्यामुळे पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घ्यायला तयार नाही. तर ग्रामपंचायतीकडून नेहमीच हा भाग दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्यावर कायम अंधार असतो. तसेच फुटपाथवर दारुड्याचे घोळके ठिकठिकाणी बसलेले असतात.