दुरुस्तीसाठी निधी नसल्याने कयाधू कालवा झाला कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:39 PM2018-05-30T17:39:46+5:302018-05-30T17:39:46+5:30
हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरलेला कयाधू कालवा सध्या कालबाह्य ठरल्यामुळे वारंवार फुटून पाणी वाया जात आहे़
- सुनील चौरे
हदगाव (नांदेड ) : हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरलेला कयाधू कालवा सध्या कालबाह्य ठरल्यामुळे वारंवार फुटून पाणी वाया जात आहे़ वरिष्ठ पातळीवरून दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्यामुळे शेवटपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही़
सन १९७६ ला सुरु झालेल्या या ९० कि़मी़ लांबीच्या कालव्याचे काम अद्यापही शेवटपर्यंत पूर्ण झाले नाही़ त्याकाळी शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी मिळाले़ हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील शेकडो शेतकरी कुटुंबे या हक्काच्या पाण्यामुळे समृद्ध झाली आहेत़ अनेक शेतकऱ्यांची जमिनी या कालव्यामध्ये गेली़ त्यांचा मावेजा अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही़ परंतु शेतीला पाणी मिळाले आहे़ या आशेने शेतकरी गप्प आहेत़ ४० वर्षापूर्वाी झालेल्या कामाची कालबाह्यता संपली आहे़ तरीही त्याच साहित्यावर हा कालवा सुरू आहे़ आजघडीला पाण्याची किंमत सोन्यासारखी झाली़
दरवर्षी पावसाळी हंगाम, रबी हंगामासाठी तीन-चार पाणीपाळ्या याच कालव्याद्वारे शेतकऱ्यांना मिळतात़ त्यानंतर कमी पाऊस झाल्याने आरक्षित केलेले पाणी जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येते़ गत चार वर्षापासून याच आरक्षित पाण्यावर दोन्ही तालुक्याची तहान भागत आहे़ परंतु पाण्याचा प्रवाह वाढविला की कालवा जागोजागी फुटतो़ यावर्षी दोन-तीन महिन्यात सात ठिकाणी कालवा फुटला़ १३ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता असून केवळ ९ क्युसेस पाण्याचा विसर्ग करता येतो़ यामुळे हेडपासून टेलपर्यंत पाणी जाण्यास विलंब होतो़ कालवा फुटला की पाणी बंद करून तात्पुरते काम केले जाते व पुन्हा पाणी सोडण्यात येते़ यामुळे वेळ चुकून मिळालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाचे नुकसान होते व त्याचा परिणाम पाणीकर वसुली करताना होतो़
जागोजागी वाढले मोठे वृक्ष
जागोजागी मोठमोठी वृक्ष वाढली आहेत़ आस्तरण मोडल्या आहेत़ मोठमोठ्या छिद्रे पडल्यामुळे ३-४ क्युसेस पाणी वाया जाते़ काही विशिष्ट गावामध्ये दरवर्षी शेतकरी कालवा फोडतात़ राजकीय बळाचा वापर करून कर्मचारी, अधिकारी यांना धमकावतात़ त्यामुळे पाण्याची चोरी होते़ यासाठी प्रतिबंध करण्यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे़ या कालव्याचे काम हेडपासून टेलपर्यंत करणे गरजेचे आहे़ त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे़ वरिष्ठ मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ स्थानिक आमदार, खासदार यांनी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय उचलून धरणे गरजेचे आहे़