कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने माहुरचे शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 06:57 PM2017-11-15T18:57:17+5:302017-11-15T18:59:53+5:30
श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी ...
श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी लागत आहे़ अशातच शासनाने कापसाला जाहीर केलेला हमीभाव अत्यंत कमी व खाजगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़
एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा खर्च अंदाजे २५ हजार रुपयांच्या आसपास आहे़ यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते़ मात्र सध्या प्रतिक्विंटल ४३५० ते ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे़ याची आकडेवारी काढली तर शेतक-याच्या हाती काहीच लागत नाही़ त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत कमी ५ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे़
मजुरांचा अभाव
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांचा अभाव असल्यामुळे बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहेत़ त्यांना प्रती ७ रुपये किलो दराने भाव द्यावा लागत आहे़ मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे़
वन्यप्राण्यांचा हैदोस
एकीकडे आस्मानी संकटांना तोंड द्यावे लागत असताना वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकºयांना हैराण केले आहे़ रोही, डुक्कर, हरीण हे वन्यप्राणी कापूस पिकाला जमीनदोस्त करीत आहेत़ त्यामुळे उभे पीक खाली पाडून नासधूस करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़
दलाल सक्रीय
शेतक-याच्या थेट दरवाजापर्यंत जावून त्यांना फूस लावून व्यापा-यांकडून शेतक-यांची मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे़ शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रीय आहेत़ अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते़ मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे़
शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही़ त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे़ शासनाने विचार करून कमीत कमी ५ हजार रुपये भाव द्यावा - दत्ता बनसोडे, शेतकरी, वानोळा.