विखे पाटलांच्या एन्ट्रीपूर्वीच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं...
By श्रीनिवास भोसले | Published: June 23, 2024 05:24 PM2024-06-23T17:24:19+5:302024-06-23T17:27:34+5:30
जाब विचारण्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचली.
नांदेड : लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षनिरीक्षक म्हणून नांदेडात दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एन्ट्रीपूर्वीच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. जाब विचारण्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत संतप्त कार्यकर्ते अन् पदाधिकारी यांना शांत केले.
नांदेडमधील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपने पक्षनिरीक्षक म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आहे. ते शनिवारऐवजी रविवारी नांदेडात हजर झाले. त्यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय ठराविक कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे आम्हाला का निमंत्रण नाही, केवळ निष्ठावंत म्हणून मिरविल्याने होत नाही, तर आम्ही जिवाचे रान केले अन् आम्हालाच जाब विचारू दिला जात नाही. तक्रारी करू दिल्या जात नाहीत, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी विखे पाटील येण्यापूर्वीच बैठक कक्षात गोंधळ घातला. त्या वेळी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि इतर पदाधिकारी समोरील व्यक्तीला विचार तुला कोण रोखले, असे बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान, काही जणांनी मध्यस्थी करत संतापलेल्या कार्यकर्त्यांना खाली बसवले आणि अध्यक्ष साहेब जाऊ द्या, असे म्हणत शांत राहण्याचे आवाहन केले. तद्नंतर बैठक कक्षातील गोंधळ शांत झाला.