शहरात उपाशी मरण्यापेक्षा गावाकडे गेलेले बरं, स्थलांतर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:16 AM2021-04-12T04:16:26+5:302021-04-12T04:16:26+5:30
हैदराबाद रेल्वे मार्गावर अन् बसस्थानकात अधिक गर्दी नांदेड शहरातील दुकाने बंद असल्याने आणि मागील वर्षभरातील तोटा सहन करून मेेटाकुटीला ...
हैदराबाद रेल्वे मार्गावर अन् बसस्थानकात अधिक गर्दी
नांदेड शहरातील दुकाने बंद असल्याने आणि मागील वर्षभरातील तोटा सहन करून मेेटाकुटीला आलेल्या व्यावसायिकांनी कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी अनेकांच्या हाताला काम नसल्याने काय करणार? असा प्रश्न पडला आहे. या परिस्थितीत घरभाडे कसे भरणार, दवाखान्याचा खर्च, घर चालविण्यासाठी लागणारा खर्च कुठून करणार? या विवंचनेत अनेकजण सापडले आहेत. त्यापेक्षा गावाकडे जाऊन शेतात काम केलेले बरे, अशी भावना मनी बाळून अनेक जण स्थलांतरित होत आहेत. आजघडीला नांदेडमध्ये असणारे तेलंगणा, आंध्र प्रदेशातील सर्वाधिक मजूर स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे.
हाॅटेलमध्ये कॅप्टन म्हणून नोकरी करत होतो. आजपर्यंत मालकाने अर्धा पगार दिला. परंतु, आता शक्य नाही म्हणून कामावरून कमी केले. घरभाडे भरायलादेखील पैसे नाहीत, त्यात घरमालक एकही दिवस थांबायला तयार नाही. त्यामुळे नांदेड सोडण्याचा निर्णय घेतला.
- प्रकाशराव सोळंकी
नांदेडमध्ये येऊन मेस, हॉस्टेल चालविण्याचा उद्योग सुरू करून चांगले नाव आणि पैसादेखील कमावला. परंतु, आजघडीला सुरू असलेला प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. त्यात घरभाडे, हॉस्टेल इमारत भाडे आणि दुकाने भाडे कुठून भरणार? असा प्रश्न आहे. - संदीप पाटील
घरकाम करून लेकीच्या शिक्षणाराबरोबच कुटुंबाचा गाडा हाकला जायचा. परंतु, लाॅकडाऊनपासून हातचे काम गेले. कोरोनाच्या भीतीने कोणीही हाताला काम देत नाही. स्वयंपाकाला लावत नाही. त्यामुळे काय काम करणार? असा प्रश्न आहे. त्यात घरमालकांना तारेखालाच किराया हवा. त्यापेक्षा गावी गेलेले बरे म्हणून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
- शोभाबाई जाधव