परराज्यांतून येणाऱ्या मिठाईपासून सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 07:52 PM2019-09-03T19:52:36+5:302019-09-03T19:54:34+5:30
गतवर्षी सापडली होती भेसळयुक्त बर्फी
नांदेड : सण-उत्सव काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेवून काही दुकानदार, व्यावसायिकांकडून भेसळयुक्त मिठाई विकण्याचा प्रयत्न केला जावू शकतो़ गतवर्षी गणपती-गौरी सणाच्या काळात जवळपास १ क्विंटल भेसळयुक्त बर्फी जप्त केली होती़ यंदा अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाईचे जवळपास ३८ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़
नांदेड जिल्ह्यात दुधाचे उत्पादन गरजेप्रमाणे आहे़ त्यामुळे मिठाई व तत्सम पदार्थांसाठी लागणारे दूध, खव्वा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो़ परिणामी भेसळ होण्याला फारसा वाव मिळत नाही़ आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीमध्ये कुठेही भेसळयुक्त मिठाई आढळून आली नाही़ स्थानिक मिठाई उत्पादक, विक्रेते यांच्याकडून भेसळ केली जात नसली तरी गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतून येणाऱ्या स्पेशल मिठाईमध्ये भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही़ गतवर्षी अन्न व औषध प्रशासन विभागाने गणपती- गौरी उत्सवाच्या काळात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुजरातची स्पेशल बर्फी पकडण्यात आली होती़ या मिठाईमध्ये भेसळ असल्याचे आणि मानवी शरीरासाठी घातक असणारे केमिकल वापरले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवळपास १ क्विंटल बर्फी नष्ट करण्यात आली होती़ त्यामुळे सण-उत्सव काळात वाढती मागणी लक्षात घेवून बाहेरची बर्फी, पेढा व इतर गोड पदार्थ व्यापारी आयात करू शकतात़ बाहेरून येणाऱ्या मिठाई, गोड खाद्यपदार्थासंदर्भात काळजी घ्यावी़ यामध्ये शिंगाडा पीठ, ताज, मैदामिश्रित मिठाई आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच त्यात वापरले जाणारे रंग शरीरासाठी घातक असतात़ सदर पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़
गणेश मंडळानी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ त्यासाठी प्रसाद उत्पादनाची जागा स्वच्छ असावी, प्रसादाला लागणारी भांडी स्वच्छ आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी, प्रसाद बनविताना लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे, कच्च्या मालाचा घटकपदार्थ परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत व त्यांचे खरेदी बिल जतन करुन ठेवावेत. मिठाई, पेढे आदी प्रसादाचे पदार्थ झाकून ठेवावेत व जंतूसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़
श्री गणेश मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावी
श्री गणेश उत्सवानिमित्ताने विविध गणेश मंडळाकडून प्रसाद तयार करुन भाविकांना वाटप करण्यात येतो. त्यामुळे गणेश मंडळांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करावी़ सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनी अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने पालन करणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जात असून आजपर्यंत संशयित ठिकाणच्या जवळपास ३८ मिठाई नमुन्यांची तपासणी केली आहे़
- टी़ सी. बोराळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासऩ