धनजमध्ये भागवतकथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:19+5:302021-01-02T04:15:19+5:30
दत्त सप्ताहाची सांगता लोहा - येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात दत्तजयंतीनिमित्त श्री दत्त नामजप ...
दत्त सप्ताहाची सांगता
लोहा - येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात दत्तजयंतीनिमित्त श्री दत्त नामजप यज्ञ सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी नगरसेविका गोदावरी सूर्यवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी सेवा समितीचे प्रकाश बोडलवार, अभिजीत रहाटकर, श्रीकांत मोरे, किशन पवार, राहुल बिडवई, पांडुरंग रहाटकर आदी उपस्थित होते.
रस्त्याची झाली चाळणी
धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट ते चोंडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असला, तरी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
घोडज येथील एकाचा मृत्यू
कंधार - तालुक्यातील घोडज येथील राजेश सखाराम घोडजकर (वय २७) या ट्रक चालकाचा वर्ध्याहून नागपूरला जाताना अपघाती मृत्यू झाला. ट्रकने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेशचा जागीच मृत्यू झाला. राजेश हा नेहमी नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे या शहरात ट्रकद्वारे माल वाहतूक करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.