Bharat Bandh : अन्नदात्याच्या आंदोलनाला नांदेडकरांचा पाठिंबा; जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 05:03 PM2020-12-08T17:03:10+5:302020-12-08T17:06:02+5:30

Bharat Bandh In Nanded : नांदेडकरांनी स्वत : हून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.

Bharat Bandh: Nandedkar's support to the Farmers movement; Strictly closed in the district | Bharat Bandh : अन्नदात्याच्या आंदोलनाला नांदेडकरांचा पाठिंबा; जिल्ह्यात कडकडीत बंद

Bharat Bandh : अन्नदात्याच्या आंदोलनाला नांदेडकरांचा पाठिंबा; जिल्ह्यात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देआजच्या बंदमध्ये कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.राजकीय पक्ष आणि संघटना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

नांदेड- केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला नांदेड जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नांदेडकरांनी स्वत : हून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, डावी आघाडी यासह इतर पक्ष आणि संघटना शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

आजच्या बंदमध्ये कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा हा शेतकर्यांच्या विरोधात असल्यामुळे पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेर्या झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. नांदेडात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व डावी आघाडीचे कार्यकर्ते शेतकर्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी चौक येथून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता.

आयटीआय चौक येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर डावी लोकशाही आघाडी व समविचारी संघटनेने निदर्शने केली. देगलूर नाका येथे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री डी.पी.सावंत, महापौर मोहिनी येवनकर, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, शिवसेना जिल्हाप्रमुखदत्ता कोकाटे, राष्ट्रवादीचे डॉ.सुनिल कदम, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, , डावी लोकशाही आघाडीचे डॉ.लक्ष्मण शिंदे, डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.जामकर, प्रा.राजू सोनसळे, ॲड.अविनाश भोसीकर, ॲड.यशोनिल मोगले यांची यावेळी उपस्थिती होती. सकाळपासून शहरासह जिल्हाभरातील बहुतांश बाजारपेठा बंदच होत्या. सायंकाळी चार वाजेनंतर मात्र तुरळक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली होती. या बंद दरम्यान कुठेही अनूचित प्रकार झाला नाही.

बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट
शेतकर्यांच्या आंदोलनाला कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंदच होत्या. दिवसभर बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले.

बसससेवाही होती ठप्प
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणनू एसटी महामंडळाने मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून बस सेवा बंद केली होती. त्यामुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली. सायंकाळनंतर मात्र काही मार्गावरील बसेस सोडण्यात आल्या होत्या.तर दुसरीकडे खाजगी वाहतुक, ऑटो मात्र सुरु होते. शहरातील रस्त्यावरील गर्दीही आज तुरळक होती.

Web Title: Bharat Bandh: Nandedkar's support to the Farmers movement; Strictly closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.