माऊलीची माया होता माझा भीमराया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:34 AM2019-04-15T00:34:57+5:302019-04-15T00:38:14+5:30
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़.
नांदेड : माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़ शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लाखो भीम अनुयायांनी मध्यरात्रीपासून अभिवादनासाठी रांगा लावल्या होत्या.‘चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया’ हीच भावना प्रत्येक भीम अनुयायाच्या मनात होती.
दीनदलित, उपेक्षित आणि वंचितांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी तत्कालीन वर्णव्यवस्थेविरूद्ध बंड पुकारत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले़ आपल्या उद्धारकर्त्या बाबांना अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले़ शहरातील बुद्धविहारात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ रविवारी सकाळी पंचशील ध्वजारोहण, त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले़ अनेक ठिकाणी धम्मदेसनेचे कार्यक्रमही झाले़ भीमजयंतीनिमित्त अन्नदान करण्यात आले़ रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता लाखो भीमअनुयायी जिल्हाभरातून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी उपस्थित राहिले़ यामध्ये लहानथोर, वृद्ध, महिलांचा समावेश होता़ जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातून दुपारी २ वाजेपासूनच मिरवणुकांना प्रारंभ झाला़ मिरवणुकीत उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, सोनियाची उगवली सकाळ, आले जगी भीमराया, धन्य ते भीमराव आंबेडकर आदी गीतांवर तरूणाईने ठेका धरला होता़ शहरात ठिकठिकाणी निळ्या पताका तसेच निळे ध्वज लावण्यात आले होते़ रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती़
महिलांनी काढली अभिवादन रॅली
भारतरत्न डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासूनच शहरातील विविध भागातून दुचाकी रॅली काढण्यात आल्या़ तर रविवारी सकाळी महिलांनीही आकर्षक निळे फेटे बांधून डॉ़आंबेडकर पुतळ्यापर्यंत दुचाकी रॅली काढल्या़ या रॅलीला महिला, युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला़ आंबेडकरी विचारांच्या घोषणात महिला, युवतीने काढलेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते़
फटाक्यांची आकर्षक आतषबाजी
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हजारो अनुयायांनी गर्दी केली होती़ रात्री बाराच्या ठोक्याला आकाशात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ यावेळी अनुयायांनी दिलेल्या ‘जयभीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ रात्री अकरा वाजेपासूनच अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्याजवळ जमत होते़ रात्री बारा वाजता तर हा परिसर गर्दीने फुलून गेला होता़
दोन दिवसांपासून पोलीस रस्त्यावर
लोकसभा निवडणुकीत दररोज नांदेड जिल्ह्यात राज्य आणि देशभरातील दिग्गजांच्या सभा होत आहेत़ त्यामुळे या सभांसाठी दररोज पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे़ त्यात रात्रपाळीतही गस्त घालणे, वाहनांची तपासणी सुरुच आहे़ त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला होता़ त्यात १३ एप्रिल रोजी रामनवमी आणि १४ एप्रिल रोजी डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असल्यामुळे या दोन्ही दिवशी जवळपास अडीच हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी नांदेड शहरात तैनात करण्यात आले होते़ तर दुसरीकडे नेत्यांच्या सभास्थळीही पोलीस तैनात होते़ त्यानंतर १५ एप्रिल रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़राहुल गांधी यांची नांदेडात सभा होणार आहे़ त्यामुळे या ठिकाणीही सकाळपासूनच पोलीस यंत्रणेला डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागणार आहे़ सलग बंदोबस्तामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे़ पोलीस अधीक्षक संजय जाधव हे स्वत: सर्व ठिकाणच्या बंदोबस्ताचे नियोजन करीत आहेत़ नांदेड पोलिसांच्या दिमतीला परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतून फौजफाटा मागविण्यात आला आहे़ त्याचबरोबर एसआरपीएफच्या कंपन्याही नांदेडात तळ ठोकून आहेत़