घनकचरा घोटाळाप्रकरणी भोकरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 04:59 PM2019-11-28T16:59:53+5:302019-11-28T17:02:01+5:30
गैरव्यवहार केल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता
भोकर (जि. नांदेड) : येथील नगर परिषदेअंतर्गत सन २०१८ मध्ये झालेल्या घनकचरा व्यवस्थापनातील घोटाळाप्रकरणी आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगटे यांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायालयाने २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील आरोपी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगटे आणि साईबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव हरी गायकवाड यांनी संगनमत करून ८ सप्टेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरातील घनकचरा व्यवस्थापनात बनावट दस्तावेज तयार करून शासनाच्या १० लाख १८ हजार ५०० रुपयांचा गैरव्यवहार केल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली.
यानंतर नगरसेवक केशव रामा मुद्देवाड यांनी तक्रार केली होती. याबाबत न्यायालयाच्या आदेशाने १४ जून २०१८ रोजी वरील तिन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून सर्व आरोपी पोलिसांना मिळत नव्हते. यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पुणे येथून आरोपी यलगटे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.