बारड गावात धार्मिक स्थळांवरील भोंगे निघणार; ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:18 PM2018-01-31T18:18:50+5:302018-01-31T18:19:30+5:30
मुदखेड तालुक्यातील बारड हे गाव नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे़ मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़
बारड : मुदखेड तालुक्यातील बारड हे गाव नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे़ मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़
धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत़ याबाबत मंगळवारी बारड ग्रामपंचायतची ग्रामसभा राजाराम शंकरराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती़ वर्षभर सर्व समाजामध्ये काही ना काही धार्मिक कार्यक्रम सुरु असतात़ या कार्यक्रमांमध्ये भोग्यांचा सर्रास वापर होतो़ परंतु या भोंग्याच्या कर्णकर्कश आवाजामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध यांना त्रास होतो़ तसेच आवाज वाढविण्याच्या चढाओढीत सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला़ ग्रामसभेला गावातील तरुण व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाळे यांनी ध्वनिप्रदूषणामुळे होणार्या परिणामांची माहिती दिली़ ग्रामसभेला माजी उपसभापती सुनील देशमुख, किशोर देशमुख, माणिक लोमटे, वसंत लालमे, नरसिंग आठवले, बालाजी आम्रे, बालाजी निलेवार, प्रभाकर भिमेवार, तलाठी मोरे, जोशी, पोलीस पाटील यशवंतराव लोमटे, विलासराव देशमुख, शुद्धोधन आठवले, यशवंत पवार यांची उपस्थिती होती़