जुनी पेन्शन योजनेसाठी मुखेड ते मुंबई विधानभवन शिक्षकाचा सायकलने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 07:16 PM2021-12-15T19:16:31+5:302021-12-15T19:17:16+5:30
सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन हक्क मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सायकलने मुखेड ते मुंबई प्रवास करून विधानभवनावर पोहचणार आहेत.
मुखेड ( नांदेड ) : कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी तुकाराम रेनगुंटवार हा शिक्षक सायकलने मुखेड ते मुंबई येथील विधानभवनाकडे निघाला आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी मुखेड येथे प्रवासाला सुरुवात केली. ठिकठिकाणी त्यांचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले.
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील विद्याविकास विद्यालय येथे कार्यरत असलेले सहशिक्षक तुकाराम रेनगुंटवार हे १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत. सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन हक्क मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सायकलने मुखेड ते मुंबई प्रवास करून विधानभवनावर पोहचणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी मुखेड येथे रेनगुंटवार यांचा तहसीलदार काशीनाथ पाटील व पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी पेशकार गुलाब शेख, डाॅ. प्रसाद नुन्नेवार, डाॅ. सतीश बच्चेवार, पुंडलिक सगर, महसूल विभागाचे संदीप भुरे, पी.जी.वारे, शेखर पाटील, बलभीम शेंडगे, जय जोशी, माधव कोंडेकर, जीवन जाधव, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे गजानन पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश डोईजड, नागेश धनशेट्टी, म्हाडीवले, जी.डी.कल्याणकर, रामकिशन उधळे, विनोद समृत, तलाठी संघटना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर रातोळीकर, गजानन पवितवार, व्यंकटी केंद्रे, कैलास बिरादार, केंद्रप्रमुख एस.एच.वाडीकर, जीवन पाटील, नागेश गोविंदवाड, बालाजी तलवारे, डी.डी.वडजेसह आदी उपस्थित होते.