मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:33 AM2024-07-02T11:33:56+5:302024-07-02T11:37:34+5:30

नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन या संघटनेच्या आक्षेपानंतर वरिष्ठ प्राध्यापक निवडीच्या प्रक्रियेला ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे.

Big news! Break in selection of senior professors in SRT University | मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक

मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक लागला आहे. या निवड प्रक्रियेला नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन या संघटनेने विरोध केला होता.

यासाठी विद्यापीठांमध्ये होणाऱ्या निवड प्रक्रियेच्या विरोधात नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन या संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजपालसिंग चिखलीकर व कार्याध्यक्ष शिवराज मंगनाळे यांनी आक्षेप घेतला होता. या संदर्भात कुलगुरू आणि विभागीय सहसंचालकांकडे तक्रारही केली होती. कॅस अंतर्गत वरिष्ठ प्राध्यापक पदासाठी १२ जून रोजी मुलाखती झाल्या. या निवड प्रक्रियेत विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेली नियमावली तथा आवश्यक गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांची निवड होऊ नये तसेच मुलाखती देणाऱ्या उमेदवारांचे संशोधन पत्रिकेत जर्नल, संशोधन लेख प्रकाशित होणे अनिवार्य असणे आवश्यक होते. मात्र छाननी समितीकडून या नियमाला बगल दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. यूजीसीच्या १८ जुलै २०१८ च्या नोटिफिकेशनचे उल्लंघन केल्याची तक्रार डॉ. चिखलीकर यांनी केली होती. प्राध्यापक श्रेणी व दहा वर्ष प्राध्यापक पदस्थानी असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व उच्च विद्या विषयक तथा संशोधनात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र कार्य असणे आवश्यक आहे. नामांकित प्रकाशन तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता असलेल्या जर्नल्समध्ये त्या उमेदवारांचे संशोधन लेख प्रकाशित होणे अनिवार्य आहे.

मुलाखतीसाठी काही उमेदवार अपात्र
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील संकुलात मुलाखतीसाठी काही उमेदवार याबाबीसाठी पात्र नव्हते. काहींचे विद्या विषयक बाबी तथा प्रकाशित संशोधन लेख विषयाशी सुसंगत व संबंधित नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे वरील निकषास ते पात्र होतात का? हे तपासावे आणि नियमांचे काटेकोर पालन करून निकषात बसत नसलेल्या उमेदवारांची वरिष्ठ प्राध्यापक पदासाठीची निवड अपात्र करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान संघटनेच्या आक्षेपानंतर वरिष्ठ प्राध्यापक निवडीच्या प्रक्रियेला ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Big news! Break in selection of senior professors in SRT University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.