“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 12:45 PM2021-10-09T12:45:09+5:302021-10-09T12:46:58+5:30
भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नांदेड: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकामागून एक घडामोडी घडत आहेत. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद तसेच पोडनिवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळाल्या. यातच आता भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात असून, लवकरच सत्ता बदल होईल, असा दावा या भाजप नेत्याने केला आहे.
राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला, तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा दावाही लोणीकर यांनी केला आहे.
शिवसेनेला धक्का बसणार का?
बबनराव लोणीकर यांच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेनेला धक्का बसणार का, याबाबत आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या समर्थनार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बबनराव लोणीकर यांनी सदर वक्तव्य केले आहे.
दरम्यान, भाजपच्या वतीने देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज माजी आमदार सुभाष साबणे यांनी दाखल केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे कार्यकर्ता मेळावा घेत प्रवेश केला. दुसरीकडे, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून, महाविकास आघाडीला कमी जागा मिळाल्या.